दिवाळीत जुना सोफा दिसेल अगदी नवा: चहा-कॉफीचे डाग आणि दुर्गंधी घालवण्याचे सोपे उपाय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोफा बदलण्यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज नाही; काही सोप्या उपायांनी जुना सोफा पुन्हा नवा दिसू शकतो.
दिवाळी जवळ आली की घरातली साफसफाई जोरात सुरू होते. घर चकाचक करण्यासाठी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. पण रोजच्या वापराने आणि साचणाऱ्या धुळीने सोफ्याची चमक हळूहळू फिकी पडते. जुना आणि मळलेला सोफा अनेकदा संपूर्ण हॉलचा लूकच बिघडवून टाकतो. अशा वेळी सोफा बदलण्यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज नसते. काही सोपे उपाय केले तर तुमचा जुना सोफा पुन्हा नवा आणि आकर्षक दिसू शकतो. दिवाळीच्या साफसफाईत सोफा लख्ख आणि फ्रेश करण्यासाठी पुढील पद्धती वापरता येतात.
सगळ्यात आधी सोफ्यातली धूळ आणि कचरा काढून टाका. साफसफाईची सुरुवात करताना व्हॅक्यूम क्लिनरने सोफ्याच्या कोपऱ्यांतली आणि कुशनखालची धूळ व बारीक कचरा पूर्णपणे साफ करावा. घरात व्हॅक्यूम क्लिनर नसेल, तर मऊ ब्रशने हलक्या हाताने धूळ झाडता येते.
यानंतर सोफ्याच्या कापडानुसार साफसफाई करायची. प्रत्येक सोफ्याचे फॅब्रिक वेगळे असते, त्यामुळे सगळ्यांना एकच पद्धत चालत नाही. फॅब्रिक सोफा असेल तर कोमट पाण्यात थोडे लिक्विड सोप मिसळून त्यात मऊ कापड भिजवावे आणि त्याने सोफा पुसावा. लेदर सोफा असेल तर आधी हलक्या ओल्या कपड्याने पुसावा आणि मग त्यावर लेदर कंडिशनर लावावे. वेलवेट सोफ्याच्या बाबतीत फॅब्रिकची रचना खराब होऊ नये म्हणून कोरड्या किंवा मऊ ब्रशने हलक्या हाताने साफ करावे.
सोफ्यावर चहा, कॉफी किंवा खाण्याचे पदार्थ सांडून डाग पडले असतील, तर त्यावर बेकिंग सोड्याची पावडर टाका. थोड्या वेळाने ओलसर कपड्याने तो भाग साफ करा. डाग घासू नका. त्याऐवजी हलक्या हाताने दाबून जादा लिक्विड शोषून घ्या, म्हणजे डाग आणखी पसरत नाही.
घरातला दमटपणा किंवा रोजचा वापर यामुळे सोफ्यातून अनेकदा विचित्र वास येऊ लागतो. तो घालवण्यासाठीही बेकिंग सोडा उपयोगी पडतो. सोफ्यावर बेकिंग सोड्याची हलकी पावडर 20 ते 30 मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर व्हॅक्यूम क्लिनरने साफ करा. त्यामुळे सोफा पुन्हा पूर्णपणे फ्रेश वाटेल.
कुशनचे कव्हर काढता येत असतील, तर ते नीट धुवून वाळवून घ्या. बजेटमध्ये राहून नवा लूक हवा असेल तर गडद किंवा सणासुदीच्या रंगांची नवीन कुशन कव्हर्स वापरून पाहा. त्यामुळे सोफ्याचा चेहरामोहरा बदलून जातो.
साफसफाई आणि सजावट झाल्यानंतर शेवटचा हात म्हणून सोफ्यावर आकर्षक थ्रो आणि मॅचिंग कुशन नीट लावून ठेवा. यामुळे तुमच्या लिव्हिंग रूमची संपूर्ण शोभा वाढेल आणि तुमचा जुना सोफा अगदी नवीन दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.