दिल्लीत 'यमुनाकाठ २०२६' दिवाळी विशेषांकाचे विजया रहाटकर यांच्या हस्ते प्रकाशन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजधानीतील मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक विश्वाला व्यासपीठ देणाऱ्या 'यमुनाकाठ २०२६' दिवाळी विशेषांकाचे नवी दिल्लीत प्रकाशन झाले. अंकात मुलाखती, लेख, रिपोर्ताज आणि फोटो फीचर आहेत.
नवी दिल्लीत 'यमुनाकाठ २०२६' या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. दिल्लीसारख्या महानगरात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
रहाटकर यांनी सांगितले की, 'यमुनाकाठ'च्या माध्यमातून राजधानीतील मराठी समाजाचे सांस्कृतिक आणि वैचारिक प्रतिबिंब उमटत आहे. माणूस कुठेही गेला, तरी त्याला आपल्या मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी जोडून ठेवणारे संस्कार महत्त्वाचे असतात, असे त्यांनी म्हटले. गोदावरीच्या काठावर घालवलेल्या बालपणीच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत, असे सांगून त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी असलेले आपले नाते अधोरेखित केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र सदनातील गुंतवणूक विभागाचे सुशील गायकवाड, वरिष्ठ पत्रकार अभिजित कांबळे, खासदार अमर काळे आणि अंकाच्या संपादक ॲड. प्राची गवांदे प्रामुख्याने उपस्थित होते. दिल्लीतील मराठी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांचीही उपस्थिती होती. दिल्लीसह देशभरातील आणि जगाच्या काही भागातील मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक विश्वाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने द समिधा इंडिया फाउंडेशनने हा विशेषांक तयार केला आहे.
विजय नाईक यांनी दिल्लीतील मराठी समाजाच्या वाटचालीचा आढावा घेतला. गेली ५८ वर्षे दिल्लीत राहत असलेल्या नाईक यांनी राजधानीत सुमारे चार लाख मराठी नागरिक राहतात, असे सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने मराठी माणसे दिल्लीत असली, तरी भाषा आणि संस्कृतीच्या उपक्रमांमध्ये आणखी जास्त लोकांनी सहभागी होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 'यमुनाकाठ'सारख्या उपक्रमांमुळे मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी आणि सांस्कृतिक नाते अधिक घट्ट करण्यासाठी व्यासपीठ मिळते, असेही त्यांनी सांगितले.
आनंद पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अभिजित कांबळे यांनी माध्यमे, भाषा आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर भाष्य केले. डॉ. श्वेता सिंघल यांनी दिल्लीतील मराठी समाजाच्या सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. सुशील गायकवाड यांनीही शुभेच्छा देत पुढील काळातही असे उपक्रम होत राहोत, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार अमर काळे यांनी 'यमुनाकाठ' साकारणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. या अंकात त्यांचा लेखही आहे. त्यांनी वर्ध्याचे माजी खासदार वसंत साठे आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेले दिवंगत ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अंकाच्या संपादक ॲड. प्राची गवांदे यांनी अंकामागची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीसह देशभरातील आणि काही प्रमाणात जगातील मराठी समाजाचे अनुभव, विचार, साहित्य आणि सांस्कृतिक जाणिवा एकत्र आणण्याचा प्रयत्न या अंकातून केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुलाखती, लेख, रिपोर्ताज आणि फोटो फीचर अशा विविध प्रकारांतून साहित्य, राजकारण, प्रशासन, माध्यम, कायदा, धोरणनिर्मिती, संशोधन, लेखन, सामाजिक कार्य, छायाचित्रण आणि शिल्पनिर्मिती या क्षेत्रांतील मान्यवरांना अंकात स्थान मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले. पहिल्याच प्रयत्नात सहभागी झालेल्या सर्व लेखकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये, नामदेव काटकर, अजिंक्य बनसोडे, ऋषी मोरे, लेशपाल जवळगे आणि रुपेश माने यांनी विशेष सहकार्य केले, म्हणून त्यांचेही आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्राची गवांदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत वाघाये यांनी केले आणि पत्रकार नामदेव काटकर यांनी आभार मानले.
अंकात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक आणि माजी केंद्रीय पोलाद सचिव अरुणा लिमये यांच्या मुलाखती आहेत. विजया रहाटकर, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार अमर काळे, खासदार राजाभाऊ वाजे, प्रशासकीय अधिकारी सुशील गायकवाड, श्वेता सिंघल, सुप्रिया देवस्थळी, प्रतिभा पारकर तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, विजय चोरमारे, सागर कुलकर्णी आणि उमेश कुमार यांचे लेख आहेत. आशय गुणे आणि प्रमोद जगताप यांचे खास रिपोर्ताज आहेत, तर शिल्पकार अनिल सुतार आणि उत्तम छायाचित्रकार असलेले अधिकारी पदमसिंह पाटील यांचे फोटो फीचरही अंकात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.