मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नवी दिल्लीतील गायत्री परिवाराच्या सोहळ्यात मुनगंटीवारांनी मांडली भारतीय संस्कृतीची महती

नवी दिल्लीतील गायत्री परिवाराच्या सोहळ्यात मुनगंटीवारांनी मांडली भारतीय संस्कृतीची महती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

माता भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार बोलले.

नवी दिल्ली येथे गायत्री परिवारातर्फे आयोजित सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय संस्कृतीच्या महानतेवर भाषण केले. वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा सोहळा झाला. अखंड ज्योतीच्या अवतरणाला १०० वर्षे पूर्ण झाली, याचेही निमित्त या कार्यक्रमाला होते.

मुनगंटीवार म्हणाले की, भारताची महानता फक्त भौगोलिक विस्तारात, सामर्थ्यात किंवा ऐतिहासिक वैभवात नाही. हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून उभ्या राहिलेल्या अध्यात्म, संस्कार, मानवता आणि विश्वकल्याणाच्या विचारपरंपरेत ती आहे. ही संस्कृती माणसामाणसांच्या मनात रुजवून तिचा प्रकाश सगळ्या जगात पोहोचवण्याचे काम गायत्री परिवार करीत आहे. हा सोहळा एका महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणाचा उत्सव तर आहेच, पण भारताच्या सनातन सांस्कृतिक चेतनेला पुन्हा जागृत करण्याचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत आध्यात्मिक मूल्यांचा वारसा नेण्याचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला केंद्रीय युवा कार्य व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया, गायत्री परिवाराचे डॉ. चिन्मय पंड्या, विश्व हिंदू परिषदेचे महासचिव स्वामी विज्ञानानंद, रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद आणि उत्तर प्रदेशचे आमदार श्री. राजेश्वर सिंह उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महात्मे आणि मोठ्या संख्येने बंधू-भगिनीही आले होते.

संत-महात्म्यांच्या विचारांनी समृद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीत येऊन गायत्री परिवाराच्या सान्निध्यात सहभागी होता आले, हा आपल्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. हजारो ऊर्जा निर्माण करणाऱ्या वीजकेंद्रापेक्षाही अधिक सकारात्मक ऊर्जा या परिवाराच्या सहवासात अनुभवायला मिळाली, असेही ते म्हणाले. सोहळ्याचे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी डॉ. चिन्मय पंड्या यांचे विशेष आभार मानले.

माता भगवती देवी शर्मा आणि वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या कार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गंगा ऋषिकेश आणि हरिद्वारच्या भूमीतून वाहते हे सगळ्यांना माहीत आहे. पण या दोघांनी समाजाला दिलेली वैचारिक आणि आध्यात्मिक गंगा प्रत्येकाच्या अंतःकरणात वाहत आहे. त्यांचे काम फक्त व्यक्तिमत्त्व घडवण्यापुरते नाही, तर समाजाच्या विचारांना नवी दिशा देणारे आहे.

मानवतेची सेवा हीच सर्वोच्च पूजा, असे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, देवपूजा आणि मंदिरातील उपासनेच्या पलीकडे जाऊन माणुसकीची पूजा करायची शिकवण गायत्री परिवाराने दिली आहे. नुसते मंदिरात जाऊन पूजा करणे म्हणजे धर्म नव्हे. मानवतेची सेवा करणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी आणि सर्वोच्च पूजा आहे. गायत्री मंत्र हा काही शब्दांचा समूह नसून माणसाच्या अंतर्मनात ऊर्जा निर्माण करणारा, जीवनाला श्रेष्ठ दिशा देणारा आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारा मंत्र आहे, असेही त्यांनी नमूद केले. जगातील अनेक संस्कृतींच्या प्रवाहात भारतीय संस्कृतीने आपल्या उदात्त मूल्यांच्या बळावर स्वतंत्र आणि अमिट स्थान मिळवले आहे, असे सांगून ही संस्कृती फक्त भारताची ओळख नाही, तर संपूर्ण विश्वाला कल्याणाचा मार्ग दाखवणारी विचारधारा आहे, असे ते म्हणाले.

भारताविषयीचा अभिमान व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले की, जगातील सर्वांत सुंदर देश कोणता, असे विचारले तर उत्तर भारतच आहे. हजारो जन्मांच्या पुण्याईने या पवित्र भूमीत जन्म घेण्याचे भाग्य मिळते. पुन्हा जन्म घेण्याची संधी मिळाली, तर तो भारतभूमीतच व्हावा, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. भारताला फक्त भौतिकदृष्ट्या नव्हे, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

डॉ. चिन्मय पंड्या यांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर चांगले रुग्णालय उभारून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देण्याची संधी त्यांच्यासमोर होती. पण त्यांनी समाजाच्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शरीराच्या आरोग्याइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे, या जाणिवेतून ते करीत असलेले काम समाजाला दिशा दाखवणारे आहे. त्यांच्या सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्याला मुनगंटीवार यांनी वंदन केले.

भाषणाच्या शेवटी मुनगंटीवार यांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. आपण भारतीय असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत भारताची महानता आणि भारतीय संस्कृतीचे तेज टिकून राहील. मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या कृतीतून या महान परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ