दिल्लीत आंदोलक विद्यार्थिनींना मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू रक्षा दलाचे चौघे अटकेत
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात विद्यार्थिनींना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौघांना अटक केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अटक झालेले लोक हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.
कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी संघटनांनी काल हे आंदोलन केले होते. त्याची चर्चा देशभर सुरू आहे. CJP चे संस्थापक अभिजित दिपके, त्यांचे सहकारी आणि विरोधी पक्षांचे काही नेते यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर आला आहे.
डीडीयू मार्गावरील कमला मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. व्हिडिओमध्ये काही जण तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करताना आणि महिलांना धक्काबुक्की करताना दिसतात. हे सगळे सुरू असताना घटनास्थळी एक पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून पोलीस व्यवस्था आणि महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांची नावे रमण सैनी (50), विवेकानंद ऊर्फ विवेक (32), कपिल कुमार (27) आणि रविंदर सिंग ऊर्फ गोविंद हिंदू (35) अशी आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. संबंधित लोक दिल्ली-एनसीआर परिसर सोडून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यावर तपासाला वेग देण्यात आला. सुरुवातीला व्हिडिओ नेमका कुठे चित्रित झाला, हे स्पष्ट नव्हते. सुरक्षा यंत्रणांनी तपास करून घटनास्थळ शोधले आणि चार जणांना अटक केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट करून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सोमवारी, 12 ऑक्टोबर रोजी काँग्रेस, संपूर्ण INDIA आघाडी आणि देशातील तरुण पुन्हा रस्त्यावर उतरतील, असे म्हटले आहे. तसेच सोमवारी मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. 10 ऑक्टोबर रोजी शहरातील वेगवेगळ्या भागांत निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीमुळे सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.