डिजिटल ॲसेट्समध्ये गुंतवणूक करताय? फसवणुकीचे पाच धोक्याचे इशारे ओळखा
कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता यांनी डिजिटल मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांना भामट्यांपासून वाचण्यासाठी पाच धोक्याचे इशारे सांगितले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशातील आर्थिक क्षेत्र वेगाने बदलत आहे. या डिजिटल फायनान्सच्या काळात 'डिजिटल ॲसेट्स' म्हणजेच डिजिटल मालमत्ता हा गुंतवणुकीचा नवा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहे. अनेक तरुण आणि नवे गुंतवणूकदार या क्षेत्रात संधी शोधत आहेत.
मात्र या क्षेत्रातील लोकांचा सहभाग जसा वाढत आहे, तशी ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची संख्याही चिंता वाटावी इतकी वाढत आहे. याबाबत कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता यांनी मार्गदर्शन केले आहे.
आजचे भामटे फक्त बनावट फोन कॉलपुरते थांबलेले नाहीत. सोशल मीडियावरचे संदेश, टेलिग्राम ग्रुप्स, व्हॉट्सॲप मेसेज, आकर्षक मोबाईल ॲप्स किंवा हुबेहूब खऱ्यासारख्या दिसणाऱ्या संकेतस्थळांमार्फत ते गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढतात. डिजिटल मालमत्तेच्या क्षेत्रात नव्याने उतरणाऱ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने पाच प्रमुख धोक्याचे इशारे ओळखले पाहिजेत.
पहिला इशारा म्हणजे 'सहज आणि जलद नफ्या'चे अवाजवी दावे. कमी किंवा कोणताही धोका न पत्करता निश्चित नफा मिळेल, किंवा अगदी थोड्या काळात भरघोस परतावा मिळेल, असे आश्वासन दिले जात असेल, तर तो सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. इतर बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीप्रमाणेच डिजिटल मालमत्तांमध्येही चढ-उतार होतात आणि त्यात जोखीम असतेच. घोटाळेबाज लोकांना विचार करू न देता लगेच पैसे ट्रान्सफर करायला लावण्यासाठी असे नफ्याचे अमिष दाखवतात. त्यामुळे योजना काय आहे, ती देणारी संस्था कोणती आणि तिची अधिकृतता तपासता येते का, याचा नीट अभ्यास करावा.
दुसरा इशारा म्हणजे अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सोशल मीडिया किंवा ईमेलवर अचानक आलेली गुंतवणुकीची ऑफर. स्वतःला 'गुंतवणूक तज्ज्ञ' किंवा नामांकित कंपनीचा 'प्रतिनिधी' म्हणवणारे लोक लक्ष वेधून घेतात. अनेकदा नामांकित ब्रँड्सचे नाव किंवा लोगो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली जातात. अशा संदेशातील फोन नंबर किंवा लिंकवर विश्वास न ठेवता, संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून माहितीची खातरजमा करावी.
तिसरा इशारा हुबेहूब दिसणाऱ्या संशयास्पद वेबसाईट आणि ॲप्सचा आहे. एखादी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप व्यावसायिक आणि आकर्षक दिसले, तरी ते अधिकृत असेलच असे नाही. गुन्हेगार कायदेशीर आणि नामांकित आर्थिक सेवांसारखे दिसणारे बनावट ॲप्स आणि वेबसाईट बनवतात. काही बनावट ॲप्स सुरुवातीला गुंतवणूकदाराचा विश्वास जिंकण्यासाठी आभासी नफा दाखवतात आणि छोट्या रकमा काढू देतात. एकदा विश्वास बसला की मोठी रक्कम जमा करायला लावून ते पसार होतात. म्हणून ॲप डाऊनलोड करताना फक्त 'गूगल प्ले स्टोअर' किंवा 'एप्पल ॲप स्टोअर' यांसारख्या अधिकृत स्रोतांचाच वापर करावा आणि वेबसाईटची युआरएल काळजीपूर्वक तपासावी.
चौथा इशारा म्हणजे ओटीपी, पासवर्ड किंवा गोपनीय माहितीची मागणी. पासवर्ड, ओटीपी (वन टाईम पासवर्ड), प्रायव्हेट की किंवा वॉलेटचा तपशील मागितला जात असेल, तर तो अतिशय गंभीर धोक्याचा इशारा आहे. घोटाळेबाज बहुतेक वेळा 'कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी' असल्याचे भासवतात आणि खाते ब्लॉक झाले आहे, ते उघडण्यासाठी किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी OTP लागेल, असे सांगून फसवतात. कोणतीही अधिकृत संस्था किंवा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे कोणी कितीही मोठा दावा केला, तरी संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर करू नये.
पाचवा इशारा म्हणजे घाईघाईत निर्णय घ्यायला लावणारा 'दबाव'. आर्थिक फसवणुकीत घोटाळेबाजांचे मुख्य हत्यार 'तात्कालिकता' (Urgency) निर्माण करणे हे असते. "लगेच गुंतवणूक करा, नाहीतर ही संधी हुकेल", "पैसे काढण्यासाठी आताच अतिरिक्त कर भरा" किंवा "सवलत संपण्यापूर्वी निर्णय घ्या", अशा प्रकारचा दबाव आणला जातो. विचार करायला वेळ न देता कोणी लगेच निर्णय घ्यायला भाग पाडत असेल, तर तिथे फसवणुकीची शक्यता सर्वाधिक असते.