जेएसडब्ल्यू कॉम्बॅट एसयूव्ही 4 डिसेंबरला भारतात येणार, 1100 किलोमीटरची कम्बाईंड रेंज
जेएसडब्ल्यू मोटर्स आपली पहिली ब्रँड न्यू एसयूव्ही 'कॉम्बॅट' येत्या 4 डिसेंबर रोजी लोकांसमोर आणणार आहे. ही प्लग-इन हायब्रिड एसयूव्ही छत्रपती संभाजीनगर येथील प्लांटमध्ये तयार केली जात आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ उडवून देण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रुप पूर्णपणे सज्ज झाला आहे. या ग्रुपची जेएसडब्ल्यू मोटर्स आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये एका नव्या आणि स्वतंत्र ब्रँडच्या रूपात एन्ट्री करत आहे. कंपनी आपली पहिली ब्रँड न्यू एसयूव्ही 'कॉम्बॅट' (JSW Combat) येत्या 4 डिसेंबर रोजी अधिकृतपणे लोकांसमोर आणणार आहे.
ही गाडी पॉवरफुल आणि प्रीमियम 5 सीटर प्लग-इन हायब्रिड (PHEV) एसयूव्ही असणार आहे. ती छत्रपती संभाजीनगर येथील प्लांटमध्ये तयार केली जात आहे.
कॉम्बॅट ही गाडी जागतिक बाजारातील प्रसिद्ध 'जेटूर टी2' (Jetour T2) वर आधारित आहे, ज्याला चेरी टी2 (Chery T2) असेही म्हटले जाते. जागतिक बाजारात जेटूर टी2 चे फेसलिफ्ट मॉडेल नुकतेच लॉन्च झाले असले, तरी भारतात येणारी कॉम्बॅट प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित असेल.
डिझाईनच्या बाबतीत ही एसयूव्ही बोल्ड आणि बॉक्सी (Boxy) लूकमध्ये असेल. तिला 20 इंचाचे अलॉय व्हील्स, मोठे व्हील आर्च क्लॅडिंग, रूफ रेल्स, बूटवर बसवलेले स्पेअर व्हील आणि व्हर्टिकल एलईडी टेललाईट्स मिळतील. भारतीय बाजारातील स्पाई फोटोंनुसार तिच्या पुढच्या आणि मागच्या बंपरमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. 'जेटूर'ऐवजी नवीन 'कॉम्बॅट'चा लोगो पाहायला मिळू शकतो.
इंजिन आणि मायलेज क्षमता हे कॉम्बॅटचे सर्वात मोठे आकर्षण आहे. भारतीय ग्राहकांसाठी या गाडीत 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, ज्यासोबत 18.4 kWh ची बॅटरी पॅक असेल. फ्रंट-व्हील ड्राईव्ह (FWD) साठी दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळतील. हा संपूर्ण हायब्रिड सेटअप 3 स्पीड डेडिकेटेड हायब्रिड ट्रान्समिशनला जोडलेला असेल. तो 360 hp पॉवर आणि 610 Nm चा मॅक्सिमम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
ही एसयूव्ही फक्त पेट्रोलवरच नाही, तर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मोडवरही धावणार आहे. एनईडीसी (NEDC) सायकलनुसार केवळ इलेक्ट्रिक पॉवरवर, म्हणजे पेट्रोल न वापरता, ती 90 किलोमीटरची ऑल-इलेक्ट्रिक रेंज देईल. दुसरीकडे, पूर्ण चार्जिंग आणि फुल फ्यूल टँक एकत्र धरल्यास ती 1100 किलोमीटरची कम्बाईंड रेंज देणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही रेंज उत्तम मानली जात आहे.
भारतीय बाजारपेठेत या लक्झरी एसयूव्हीची थेट टक्कर महिंद्रा स्कॉर्पियो-एन (Mahindra Scorpio-N), टोयोटा फॉर्च्यूनर (Toyota Fortuner) आणि टोयोटा लँड क्रूझर यांसारख्या दिग्गज गाड्यांशी होण्याची शक्यता आहे. किंमत आणि फिचर्सच्या बाबतीत ही गाडी बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.