धन्वंतरींची पूजा धनत्रयोदशीला का? समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या देवाची कथा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आरोग्याचे देव मानल्या जाणाऱ्या भगवान धन्वंतरींची उत्पत्ती, त्यांचे रूप आणि धनत्रयोदशीशी असलेले नाते पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते.
भगवान धन्वंतरी हे हिंदू धर्मात आरोग्याचे देव, आयुर्वेदाचे प्रवर्तक आणि देवांचे वैद्य (डॉक्टर) मानले जातात. हिंदू संस्कृतीत निरोगी आयुष्याला खूप मोठे महत्त्व आहे. म्हणूनच या आरोग्याचे अधिष्ठाते या नात्याने धन्वंतरींची पूजा केली जाते. धन्वंतरी कोण आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांच्याशी जोडलेली पौराणिक कथा काय आहे, ते पाहूया.
'धन्वंतरी' या शब्दाचा उगम 'धन्वन्' आणि 'अरी' या दोन शब्दांतून झाला आहे. 'धन्वन्' म्हणजे धनुष्य किंवा शल्यचिकित्सा/शास्त्रक्रिया, तर 'अरी' म्हणजे पारंगत असलेला. वैद्यकीय शास्त्राचे, विशेषतः शल्यचिकित्सेचे संपूर्ण ज्ञान ज्यांना आहे, त्यांना धन्वंतरी म्हटले जाते.
धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. त्यांच्या चार हातांत शंख, चक्र, औषधी वनस्पती (किंवा जळू/जलौका) आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे 'अमृताने भरलेला कलश' असतो. आयुर्वेदाचे मूळ प्रणेते म्हणून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्यांच्या उत्पत्तीची सर्वात प्रसिद्ध कथा समुद्रमंथनाशी जोडलेली आहे. ही कथा श्रीमद्भागवत पुराण, विष्णू पुराण आणि महाभारतात आढळते.
कथा अशी की, महर्षी दुर्वास यांच्या शापामुळे देवराज इंद्र आणि पर्यायाने सगळे देव ऐश्वर्यहीन आणि शक्तीहीन झाले. दैत्यांनी (राक्षसांनी) देवांवर विजय मिळवला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्यांना असुरांसोबत मिळून समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. त्यातून निघणारे अमृत प्राशन करून अमर होता येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून क्षीरसागराचे (दुधाचा समुद्र) मंथन सुरू केले.
या मंथनातून एकूण १४ रत्ने बाहेर पडली. लक्ष्मी, कामधेनु, ऐरावत हत्ती, कल्पवृक्ष यांच्यानंतर सर्वात शेवटी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला, एक अत्यंत तेजस्वी पुरुष समुद्रातून प्रकट झाला. तेच भगवान धन्वंतरी. ते दिसायला अत्यंत सुंदर, विशाल छातीचे आणि चतुर्भुज (चार हात असलेले) होते. प्रकट होताना त्यांच्या हातात अमृताने भरलेला सुवर्ण कलश होता. हा कलश घेऊन ते प्रकट झाल्यामुळेच देवांना अमरत्व मिळवणे शक्य झाले.
ज्या दिवशी धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले, तो दिवस धनत्रयोदशी (दिवाळीचा पहिला दिवस) म्हणून साजरा केला जातो. धन्वंतरी जयंती म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी फक्त संपत्तीची (धनाची) पूजा होत नाही, तर खऱ्या अर्थाने 'आरोग्यरूपी धनाची' पूजा केली जाते. भारत सरकारने हा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणून घोषित केला आहे. या दिवशी लोक निरोगी आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी धन्वंतरींची उपासना करतात आणि दीपदान करतात.
पुराणानुसार, समुद्रमंथनातून प्रकट झाल्यानंतर धन्वंतरींनी विष्णूंना विचारले की जगात माझे स्थान काय असेल. तेव्हा विष्णू म्हणाले, "तू लोकांचे दुःख आणि रोग दूर करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेशील." त्यानुसार द्वापार युगात काशीचे राजे 'धन्वा' यांच्या पोटी धन्वंतरींनी 'दिवोदास' म्हणून जन्म घेतला. त्यांनी ऋषी-मुनींना आणि माणसांना आयुर्वेदाचे ज्ञान दिले. सुश्रुत संहितेचे निर्माते 'महर्षी सुश्रुत' हे राजे दिवोदास (धन्वंतरी) यांचेच शिष्य होते. त्यांना दिवोदासांनी शल्यचिकित्सेचे (Surgery) जगातील पहिले प्रगत ज्ञान दिले.
हिंदू संस्कृतीत "पहिलं सुख निरोगी काया" मानले जाते आणि भगवान धन्वंतरी हे याच आरोग्याचे प्रतीक आहेत. माणसाचा आजारांपासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी आयुर्वेदासारखे महान शास्त्र दिले. त्यामुळेच आजही कोणत्याही वैद्यकीय उपचाराची किंवा औषधोपचाराची सुरुवात करताना भगवान धन्वंतरींचे स्मरण केले जाते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.