धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नवरात्रोत्सवासाठी नागपूर पोलिसांचा सुरक्षा आराखडा, लाखोंच्या गर्दीची जय्यत तयारी
आगामी ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नवरात्रोत्सव लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.
नागपूर : आगामी ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नवरात्रोत्सव लक्षात घेऊन नागपूर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा बैठक झाली.
या बैठकीला पोलीस विभागाशिवाय महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, NIT, महावितरण आणि अन्न व औषध प्रशासन यांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांचे अधिकारी एकत्र बसून तयारीचा आढावा घेतला गेला.
येत्या ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. २० ऑक्टोबरला ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी साजरी होणार आहे. या काळात नागपुरात मोठ्या संख्येने भाविक आणि अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा आणि नागरिकांच्या सुविधा यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
दीक्षाभूमी, बजाजनगर, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि भिलगावातील नागलोक या प्रमुख ठिकाणी लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. म्हणून संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे, धार्मिक स्थळे, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.
याशिवाय वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, CCTV निगराणी, पेयजल, स्वच्छता, वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नवरात्रोत्सवादरम्यान गरबा, दांडिया, देवी विसर्जन मिरवणुका आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे.
महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
नागरिकांनी उत्सव शांततेत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करावा, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.