डेटिंगमध्ये Gen Z चा नवा ट्रेंड: समोरच्याला बॅकअप म्हणून बेंचवर बसवून ठेवणं
आवडणं आणि आयुष्यात जागा देणं या दोन वेगळ्या गोष्टी ठरत असताना Gen Z मध्ये बेंचिंग नावाचा प्रकार वाढतोय. तो नेमका काय आहे, ते पाहूया.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
Gen Z हे दोन शब्द कानावर पडले की ९० च्या दशकात ऐलियनच्या गोष्टी रंगवून सांगितल्या जायच्या, त्याची आठवण येते. मानवानं जन्माला घातलेलं हे एक वेगळंच रसायन आहे आणि त्यांचं विश्व त्यांनाच ठाऊक. प्रत्येक बाबतीत ही पिढी आघाडीवर असते, मग प्रेमप्रकरणात ती मागे कशी राहील? इथेही ही मुलं दोन पावलं पुढे आहेत आणि त्यांच्यात सध्या एक नवा ट्रेड रंगतोय. त्याला 'बेंचिंग ट्रेड' असं नावही दिलं गेलं आहे.
आता बेंचिंग म्हणजे नेमकं काय? सध्याच्या काळात डेटिंग करताना एखादी व्यक्ती आवडणं आणि तिला आपल्या आयुष्यात जागा देणं या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या आहेत. अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याशी बोलते, फ्लर्ट करते, विचारपूस करते, पण नात्याबद्दल काहीच स्पष्ट सांगत नाही. आपल्याला वाटतं की गोष्ट पुढे जाईल, पण ती व्यक्ती आपल्याला पूर्णपणे आपलंही मानत नाही आणि दूरही जाऊ देत नाही. डेटिंगच्या जगात या वागण्यालाच बेंचिंग म्हणतात.
याचा अर्थ असा की नात्यात एखाद्याला पहिली पसंती म्हणून निवडण्याऐवजी बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवणं. क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला मैदानात उतरवण्याऐवजी बेंचवर बसवलं जातं आणि आपली वेळ कधी येईल याची वाट पाहत त्याला थांबावं लागतं. तसंच Gen Z डेटिंगमध्ये समोरच्याला वाट पाहायला लावतो.
इंतजार हा खूप छान उर्दू शब्द आहे, पण त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. बेंचिंगमध्ये समोरची व्यक्ती मधूनमधून बोलते किंवा अचानक मेसेज करून आपला इंटरेस्ट दाखवते. पण भेटण्याचा, कमिटमेंटचा किंवा नातं पुढे नेण्याचा विषय आला की ती एकदम मागे हटते. समजा, तुम्ही एखाद्याशी अनेक दिवस बोलत आहात. तो तासनतास चॅट करतो, मग अचानक अनेक दिवस गायब होतो. तुम्हीही अंतर ठेवायचा प्रयत्न केला की त्याचा किंवा तिचा पुन्हा मेसेज येतो. "कशी आहेस?", "कसा आहेस?" किंवा "खूप दिवसांत बोलणंच झालं नाही" असं काहीतरी त्यात असतं. तो किंवा ती आपल्याबद्दल सीरियस होतेय असं वाटतं, पण थोड्या वेळाने पुन्हा गायब होते.
Gen Z हे वेगळ्याच प्रकारचं रसायन आहे, त्यांचं स्वतःचं एक विश्व आहे आणि शिक्षणामुळे त्यांना व्यवहारी जीवन लवकर समजलं आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे समोरच्याशी कसं वागायचं हे त्यांना ठाऊक असतं. बोलता बोलता कोणी गायब झालं की त्याला किंवा तिला वाटतं की त्या व्यक्तीचं कुठेतरी दुसरं प्रेमप्रकरण सुरू असेल आणि आपण फक्त दुसरा पर्याय आहोत. मात्र मेसेजला उशिरा उत्तर येणं किंवा कमी बोलणं म्हणजे बेंचिंग नव्हे. खरा मुद्दा सातत्याने येणारा अनुभव, समोरच्याची वागणूक आणि त्याचे इरादे हा आहे.
मग हे असं का वागतात? काहींना एकटं राहायचं नसतं. काहींना आपले ऑप्शन ओपन ठेवायचे असतात आणि काहींना हे नातं हवं आहे की नको, हेच कळत नसतं. सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवर नव्या लोकांशी गाठीभेटी होतात, त्यामुळे काही जण एकाच वेळी अनेकांशी चॅट करत असतात.
कोणी वारंवार रस असल्याचं दाखवत असेल, पण भेटण्याचा प्लान ठरवून तो टाळत असेल किंवा रिलेशनशिपसारख्या विषयांवर बोलणं टाळत असेल, तर त्याच्या वागण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी स्वतःला गुंतवून ठेवण्यापेक्षा समोरच्याला थेट विचारा की या नात्यातून त्याला नेमकं काय हवं आहे आणि तो असा का वागतोय. आपण त्याला आवडलंच पाहिजे म्हणून सतत त्याचं लक्ष वेधून घेण्याची गरज नाही. ती व्यक्ती फक्त तिच्या मोकळ्या वेळेत आपली आठवण काढत असेल, तर आपणही तिला तेवढ्यापुरतीच आयुष्यात जागा द्यायची का, याचा विचार करायला हवा. बाकी Gen Z खूपच हुशार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.