गोंडवाना विद्यापीठाकडून दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा शुल्क माफ
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती घोषित झालेल्या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा आदेश जारी केला आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे हे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. हा आदेश फक्त या तालुक्यांतील महाविद्यालयांना लागू आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यातील सर्व कुलगुरूंची ऑनलाइन बैठक झाली. त्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार हा आदेश निघाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील, दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांतील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे शुल्क माफ होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळी-२०२६ च्या परीक्षांसाठी महाविद्यालयात आधीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते तात्काळ परत करण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. हे शुल्क महाविद्यालयामार्फत आधीच विद्यापीठाकडे जमा झाले असेल, तर विद्यापीठ प्रशासन ते संबंधित महाविद्यालयांना लगेच परत करणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांनी ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
हे आदेश फक्त दुष्काळसदृश परिस्थिती घोषित असलेल्या तालुक्यांतील महाविद्यालयांनाच लागू राहतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सगळी प्रक्रिया वेळेत पार पडावी म्हणून सर्व संलग्न महाविद्यालयांनी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कामे येत्या २३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन परशुराम मुंगळे यांनी केले आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विद्यार्थ्यांनी या सवलतीची नोंद घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.