शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:56 IST

भिमराव मुडे यांची 'प्रेमायण' वेबसिरीज १६ ऑक्टोबरपासून स्टेज ओटीटीवर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे यांची नवी मराठी वेबसिरीज 'प्रेमायण' १६ ऑक्टोबर २०२६ पासून स्टेज ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

भिमराव मुडे यांची 'प्रेमायण' वेबसिरीज १६ ऑक्टोबरपासून स्टेज ओटीटीवर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता 'प्रेमायण' या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहे. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणारे व्यासपीठ म्हणून स्टेज ओटीटीचा उल्लेख केला जातो.

'बार्डो' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या मुडे यांनी 'अंधार माया', 'रुद्रम', 'डावपेच', 'कौल मनाचा' आणि 'तारिणी' अशा कलाकृतींमधूनही आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, माणसांच्या नात्यांमधली गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू ते आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडतात. यावेळी ते प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर आणत आहेत.

या वेबसिरीजचे क्रिएटर मुडे आहेत. राजेश पाठक (कंटेंट हेड, स्टेज मराठी) यांच्या कथेला मुडे यांच्या संकल्पनेची जोड मिळाली आहे. आरा मल्टिमीडिया निर्मित या सिरीजचे दिग्दर्शन राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी केले आहे. 'प्रेमायण' हा मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, जातीव्यवस्था, प्रेमातील गुंतागुंत, प्रतिष्ठेचा संघर्ष, सत्तेची समीकरणे आणि सूडाची धग यांचा थरारक संगम या सिरीजमध्ये अनुभवायला मिळणार आहे. प्रेमाच्या वाटेवर उभे राहणारे सामाजिक अडथळे, प्रतिष्ठेसाठी सुरू असलेली धडपड आणि वैयक्तिक संघर्षांतून निर्माण होणारे नाट्य यांमुळे कथाविश्व अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

नात्यामागची एक वेगळी बाजू आणि प्रत्येक निर्णयामागची एक वेगळी कहाणी 'प्रेमायण'मधून उलगडणार आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ गुंतवून ठेवणार नाही, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडेल, असा विश्वास भिमराव मुडे यांनी व्यक्त केला.

सिरीजमध्ये हार्दिक जोशी, अभिनव कुरणे, प्रतीक्षा पोकळे, ओमप्रकाश शिंदे, उमेश जगताप, शुभांगी भुजबळ, पल्लवी ओंकार आणि विनोद लव्हेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची दमदार फळी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले कथानक यांमुळे प्रेक्षकांमध्ये या सिरीजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

'बार्डो'पासून 'प्रेमायण'च्या नव्या डिजिटल प्रवासापर्यंत मुडे यांची वाटचाल सातत्याने नवनवीन विषयांना स्पर्श करणारी ठरली आहे. प्रेम, प्रतिष्ठा, सत्ता आणि सूड यांच्या संघर्षातून उलगडणारे हे कथाविश्व प्रेक्षकांना किती भावते आणि मराठी वेबविश्वात कोणती नवी छाप उमटवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ