भाजपच्या पदयात्रेमुळे नागपुरात वाहतूक ठप्प, दिवाळीच्या खरेदीला निघालेले रस्त्यात अडकले
भाजपच्या 'सेव्ह डेमोक्रसी' पदयात्रेसाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते आल्याने गुरुवारी नागपुरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या.
भारतीय जनता पक्षाच्या 'सेव्ह डेमोक्रसी' पदयात्रेमुळे गुरुवारी नागपूर शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शक्तिप्रदर्शनाचा फटका सर्वसामान्य नागपूरकरांना बसला. विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून 30 ते 35 हजारांहून अधिक कार्यकर्ते 5 हजारांपेक्षा जास्त वाहनांनी शहरात आले आणि मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक तासन् तास वाहतुकीत अडकून पडले. एका राजकीय कार्यक्रमासाठी इतकी मोठी गर्दी शहरात आणताना सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार झाला होता का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
छत्रपती चौक ते मानकापूर या रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे थांबली होती. वर्धा रोडवरून शहरात येणाऱ्या मार्गांवरही हीच स्थिती होती. जनता चौक आणि संविधान चौक यांच्या दरम्यान लांब रांगा लागल्या. कस्तुरचंद पार्क उड्डाणपूल, एलआयसी चौकातील उड्डाणपूल आणि आदिवासी गोवारी उड्डाणपूल या ठिकाणीही मोठी कोंडी झाली. पदयात्रेसाठी आणलेल्या वाहनांनी शहराची रोजची वाहतूक अडवून टाकल्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहनचालकांना पुढे सरकताच येत नव्हते.
सीताबर्डी आणि धंतोली येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीपूर्वी खरेदीदारांची गर्दी होती. पदयात्रेमुळे वाहतुकीचे मार्ग अडले आणि लोकांना बाजारात पोहोचणे अवघड झाले. पोलीसांनी अनेक रस्ते बंद केल्याने नागरिकांना लांबच्या वळणाने जावे लागले. खरेदीला निघालेली कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे ऐन सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
धंतोली आणि रामदासपेठ भागात अनेक मोठी खासगी रुग्णालये आहेत. संध्याकाळच्या वेळी या भागात आधीच वाहतूक जास्त असते. पदयात्रेच्या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. रस्ते गर्दीने भरलेले असताना आपत्कालीन सेवांसाठी वेगळी मार्गिका आणि पुरेशी व्यवस्था केली होती का, असा गंभीर प्रश्न यातून उभा राहिला आहे. रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकांना अडथळे पार करावे लागत असतील, तर वाहतूक नियोजनाचे दावे किती प्रभावी आहेत, हा प्रश्न उरतोच.
या पदयात्रेसाठी 700 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. वाहतूक कोंडी होऊ दिली जाणार नाही, असा दावाही पोलीसांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात या दाव्यांमध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये मोठे अंतर दिसले. प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि बाजारपेठांकडे जाणारे रस्ते वाहनांनी खचाखच भरले होते. एवढा मोठा बंदोबस्त असूनही यंत्रणांना वाहतूक सुरळीत ठेवता का आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
'सेव्ह डेमोक्रसी' पदयात्रेच्या गदारोळात सामान्य नागरिकांचे हाल मागे पडले. राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाच नाही. पदयात्रा संपेल, कार्यकर्ते घरी परततील, पण वाहतुकीत वाया गेलेला वेळ आणि नागरिकांना झालेला त्रास कोण भरून काढणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.