बांगलादेशात गारमेंट कामगार रस्त्यावर, ५२९ कारखान्यांचे काम ठप्प
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशातील गारमेंट कामगारांनी आंदोलन सुरू केले असून सरकारने सहा सदस्यीय वेतन मंडळ स्थापन केले आहे.
बांगलादेशात गारमेंट कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असून त्याला गंभीर वळण लागले आहे. बांगलादेश अनेक उद्योगधंद्यांसाठी ओळखला जातो आणि तेथील वस्त्रोद्योगही तितकाच प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांत याच क्षेत्राला उतरती कळा लागली असून तेथील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
वाढती महागाई, अन्नधान्य आणि रोजच्या वापरातील गरजांच्या खर्चात झालेली वाढ यामुळे गारमेंट कामगारांनी वेतनवाढीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. राजधानी ढाक्यासह गाझीपूर, सावर आणि आशुलिया या औद्योगिक भागांत हजारो कामगार रस्त्यावर उतरले आहेत. किमान मासिक वेतन सध्याच्या १२ हजार ५०० टका वरून ३० हजार टका करावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनादरम्यान रस्ते अडवण्यात आले असून काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्षही झाला आहे.
बांगलादेश गारमेंट मनुफ्रॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोशिएशनच्या (BGMEA) माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनामुळे देशातील ५२९ गारमेंट कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे जवळपास ९ लाख ८७ हजार कामगार प्रभावित झाले आहेत. मात्र हा आकडा बेरोजगार झालेल्या कामगारांचा नसून, कारखाने बंद राहिल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम झाला, त्यांचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ढाका आणि गाझीपूरमध्ये आंदोलकांनी रस्ते रोखल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी दगडफेक झाली, वाहने जाळण्यात आली आणि पोलिसांसोबत मारामारी झाल्याच्या घटनाही घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. या घडामोडींमुळे बांगलादेशच्या महत्त्वाच्या निर्यात क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आंदोलनाची दखल घेऊन पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहा सदस्यीय वेतन मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत गारमेंट कामगारांच्या वेतनरचनेचा आढावा घेतला जाणार आहे. सरकारने कामगारांना कामावर परत जाण्याचे आवाहनही केले आहे.
बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली असून जनतेमध्ये पुन्हा राग आणि असंतोष दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात देशव्यापी उठाव झाला होता. शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात यावे लागले. त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले. आता तारिक रहमान पंतप्रधान झाले असून जमात-ए-इस्लामी हा विरोधी पक्ष आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.