दुष्काळी शेतकऱ्यांना शिवसेनेकडून ७ लाख ६९ हजार दिवाळी किट्स, ५ लाख ३८ हजार ५०० वाटले
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेने दिवाळी शिधा किट्सची मोहीम राबवली आहे. उरलेले किट्स दोन दिवसांत पोहोचतील, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.
संकटात सापडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हात द्यायचा, या उद्देशाने शिवसेना राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा किट्स देणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुंबईत बाळासाहेब भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परांजपे यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी ५ लाख ३८ हजार ५०० किट्स आतापर्यंत वाटून झाले आहेत. बाकीचे किट्स येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हातात पडतील. मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर भागातल्या २७८ तालुक्यांतील शेतकरी कुटुंबांना हे किट्स मिळाले आहेत. विभागवार पाहिले तर मराठवाड्यात १ लाख ७७ हजार, नाशिक विभागात १ लाख ३५ हजार, पुणे विभागात ८२ हजार, अमरावती विभागात ७७,५०० आणि नागपूरमध्ये ६६ हजार किट्स दिले गेले. याशिवाय १० हजार उसतोड कामगारांनाही दिवाळी शिधा देण्यात आला. कोकणात शेवटच्या टप्प्यात किट्स वाटले जातील.
राज्य सरकारने ३५८ पैकी ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातल्या २७८ तालुक्यांतील शेतकऱ्यांपर्यंत शिवसेनेने शिधा पोहोचवला. दसऱ्याच्या दिवशी ठाण्यातून ६० ट्रक आणि मुंबईतून ४० ट्रक शिधा रवाना झाला होता. शिवसेना डॉक्टर सेलमार्फत गरिबांना ५००० दिवाळी शिधा दिला जाणार आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.
परांजपे म्हणाले की, १९७२ नंतर महाराष्ट्रात इतका भीषण दुष्काळ पडला आहे आणि राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबरमध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय पथके राज्यात आली आणि पाहणी करून गेली. दसरा मेळाव्यात शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करायची, असे निर्देश शिंदे यांनी पक्षाचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांना दिले आहेत. येत्या तीन दिवसांत हे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील, असे परांजपे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पत्नी आणि माता भगिनींना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकली पक्षाने दिल्या आहेत. 'मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण' आणि 'भगवा घेऊन खांद्यावर शिवसैनिक शेतकऱ्याच्या बांधावर' अशा सूचना शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुलीच्या लग्नाची चिंता करू नये, असे सांगून परांजपे म्हणाले की, डिसेंबरनंतर शिवसेना सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रमुखांकडे नोंदणी करायची आहे. दुष्काळी भागातल्या शिवसेनेच्या शाखा शेतकरी सेवा केंद्र म्हणून काम करतील. तिथे शासनाच्या योजनांची माहिती मिळेल, मनरेगा नोंदणी होईल आणि पंचनाम्यातल्या अडचणी सोडवल्या जातील. हे उपक्रम फक्त दिवाळीपुरते नसून पुढच्या पावसाळ्यापर्यंत चालतील, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार आहेत, असे परांजपे म्हणाले. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी कॉमन मॅन म्हणून काम केले, नंतर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम केले आणि आता दुष्काळाच्या संकटात ते डेडिकेटेड टू चेंज मेकर ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले. बुधवारी काशी नगरीत शिंदे यांना सनातन मार्तंड आणि धर्मध्वजाधारक या पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले, असेही परांजपे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत, या तक्रारीवर परांजपे म्हणाले की, शिंदे महायुतीच्या २३२ आमदारांची कामे करतातच, पण विरोधकांचीही कामे करतात. त्यामुळे राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार त्यांना केव्हाही भेटू शकतो. ठाण्यातील पूर्णेकर हत्याप्रकरणी ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासून विरोधकांनी पूर्णेकर कुटुंबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना आणि शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पूर्णेकरांच्या कुटुंबासाठी ठाण्यात येणाऱ्या विरोधकांनी दिशा सालियनच्या कुटुंबाची भेट घेण्याचे धारिष्ट्य का दाखवले नाही, असा सवाल त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणी शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ सीबीआयच्या प्रमुखांना भेटेल, असेही परांजपे यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.