AU Small Finance Bank वर सायबर हल्ल्याचा हॅकर ग्रुपचा दावा; बँक म्हणते मुख्य यंत्रणा सुरक्षित
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ScarlettGroup नावाच्या हॅकिंग ग्रुपने AU Small Finance Bank चा ग्राहक आणि अंतर्गत डेटा चोरल्याचा दावा केला आहे. बँकेने मुख्य सर्व्हर आणि अंतर्गत सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या AU Small Finance Bank वर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. एका हॅकिंग ग्रुपने बँकेचा अत्यंत संवेदनशील ग्राहक आणि अंतर्गत डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. सायबर सुरक्षेवर लक्ष ठेवणाऱ्या '@H4ckmanac' या 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून ही माहिती शेअर करण्यात आली.
'ScarlettGroup' नावाच्या हॅकिंग ग्रुपने हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. चोरलेला डेटा सार्वजनिक करण्याची धमकीही या ग्रुपने दिली आहे. त्या पोस्टमध्ये हा प्रकार 29 ऑक्टोबर 2026 रोजी नोंदवला गेल्याचे म्हटले असून, त्याची पडताळणी बाकी असल्याचेही नमूद आहे.
सोशल मीडिया पोस्टनुसार हॅकर्सनी बँकेच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची अत्यंत वैयक्तिक व आर्थिक माहिती लीक केल्याचे म्हटले आहे. यात ग्राहकांचे पॅन कार्ड, आधार कार्डचे तपशील आणि इतर ओळखपत्रे आहेत. त्याचबरोबर बँक स्टेटमेंट, क्रेडिट रिपोर्ट्स, कर्जाचे अर्ज, ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या आणि केलेले करार यांचाही त्यात समावेश असल्याचा दावा आहे. विमाविषयक नोंदी आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट डेटा यांचाही उल्लेख आहे. शिवाय बँकेच्या कर्मचाऱ्यांची माहिती, लॉगिन हिस्टरी आणि अंतर्गत ऑडिट लॉग्सवरही हॅकर्सनी डल्ला मारल्याचे सांगण्यात येते.
हे दावे खरे ठरले, तर लाखो ग्राहकांची अत्यंत गोपनीय माहिती धोक्यात येऊ शकते. अशा संवेदनशील डेटाचा वापर सायबर गुन्हेगार आयडेंटिटी थेफ्ट, आर्थिक फसवणूक, फेक क्रेडिट कार्ड्स आणि इतर ऑनलाईन स्कॅम्ससाठी करू शकतात.
या प्रकरणावर AU Small Finance Bank ने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. बँकेचे मुख्य सर्व्हर आणि अंतर्गत सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. सेलफोर्सद्वारे (Salesforce) चालवल्या जाणाऱ्या आणि होस्ट केलेल्या एका सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस (SaaS) प्लॅटफॉर्मशी संबंधित संभाव्य डेटा लीकची बँक सखोल चौकशी करत आहे. या प्लॅटफॉर्मवर आमच्या वाहन कर्ज (Vehicle Loan) ग्राहकांशी संबंधित मोजकाच डेटा आहे, असे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
बँकेची स्वतःची यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असून त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, तसेच सर्व बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत, अशीही माहिती बँकेने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर AU Small Finance Bank च्या ग्राहकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक अधिकारी बनून येणाऱ्या बनावट कॉल, एसएमएस किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नये. पॅन, आधार कार्ड क्रमांक, बँकिंग पासवर्ड किंवा ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नये. बँक खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवावे आणि कोणताही संशयित व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.