जळगावात उघड्या गटारीत दुचाकीसह कोसळून ३७ वर्षीय नवल सोनवणे यांचा मृत्यू
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकीसह कोसळून एका ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवल अर्जुन सोनवणे असे या मृत तरुणाचे नाव आहे. गटारीचे काम अपूर्ण होते, पण त्या जागी कोणताही इशारा फलक किंवा सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नव्हती, त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार नवल सोनवणे शेतातले काम संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. मेहरूण बगीचा परिसरात काँक्रीटच्या गटारीचे काम सुरू आहे. या कामाचा काही भाग अपूर्ण अवस्थेत असल्याने रस्त्याच्या मधोमध गटार आहे, याचा त्यांना अंदाज आला नाही. तिथे कोणताही इशारा फलक नव्हता, म्हणून ते दुचाकीसह थेट गटारीत कोसळले.
गटारीत पडल्यामुळे सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
नवल सोनवणे जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत पत्नी, आई, मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहत होते. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याच्या मधोमध गटारीचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच अपूर्ण कामाच्या ठिकाणी इशारा फलक का लावण्यात आला नव्हता, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.