ध्रुव राठीकडे सुमारे ५८ कोटींची संपत्ती; यूट्यूब, कोर्सेस आणि स्पॉन्सरशिपमधून कमाई
जर्मनीत स्थायिक असलेला युट्युबर ध्रुव राठी याची एकूण संपत्ती सुमारे ५८ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे; त्याची कमाई कुठून होते, याबद्दल लोकांना उत्सुकता आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय राजकारणात सध्या बरीच उलथापालथ होत आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात CJP सह विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या अंदाधुंद परिस्थितीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. CJP ने १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. भारतीय वंशाचा आणि जर्मनीत स्थायिक असलेला प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी या आंदोलनात सामील होणार होता. मात्र केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन होऊच दिले नाही. त्यानंतर ध्रुव राठीची संपत्ती नेमकी किती आणि त्याची सर्वाधिक कमाई कुठून होते, याबद्दल लोकांना उत्सुकता आहे.
ध्रुव राठीची एकूण संपत्ती सुमारे ५८ कोटी रुपये आहे, असा अंदाज आहे. त्याने आपली संपूर्ण मालमत्ता आणि कमाई कधीही सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही. त्याच्याकडे टेस्ला, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या गाड्याही आहेत. कमाईच्या आकड्यांपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न असा की, जर्मनीत राहणारा ध्रुव राठी भारतातून जास्त कमावतो की जर्मनीतून? यूट्यूब हेच त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे की त्याचे इतर व्यवसायही आहेत, हाही प्रश्न चर्चेत आहे.
ध्रुव राठी त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग यूट्यूबवरून मिळवतो. त्याचे व्हिडिओ राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर असतात. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि त्यासाठी यूट्यूब पैसे देते. याशिवाय व्हिडिओवर जाहिराती दाखवल्या गेल्या, की क्रिएटरला त्यातूनही कमाई होते.
यूट्यूबवरील कमाई केवळ सबस्क्राइबर्सवर अवलंबून नसते. व्ह्यूजची संख्या, दर्शकाचा मूळ देश, व्हिडिओचा कालावधी आणि जाहिरात कंपन्या जाहिरातींवर किती खर्च करतात, या सर्वांचा कमाईवर परिणाम होतो. मुख्य चॅनलशिवाय ध्रुव राठीचे एक व्लॉग चॅनल आणि एक शॉर्ट्स कंटेंट चॅनलही आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत त्याला पोहोचता येते. मात्र त्याच्या मासिक यूट्यूब कमाईची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
मोठ्या डिजिटल क्रिएटर्सची कमाई फक्त यूट्यूबवरील व्ह्यूज किंवा जाहिरातींपुरती मर्यादित नसते. कंपन्या आपल्या उत्पादनांचा आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी क्रिएटर्ससोबत करार करतात आणि त्या बदल्यात त्यांना पैसे देतात. ब्रँड पार्टनरशिप आणि स्पॉन्सरशिप हेही ध्रुव राठीसारख्या प्रमुख क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय असतो.
ध्रुव राठीचे इतरही व्यावसायिक उपक्रम आहेत. तो ऑनलाइन कोर्सेस, मर्चंडाईज आणि 'एआय फिएस्टा' नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्ममधून कमाई करतो, असे सांगितले जाते. या व्यवसायांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा नेमका आकडा त्याने कधीही सार्वजनिकरित्या उघड केलेला नाही. क्लासेसप्रमाणेच ऑनलाइन कोर्सेसमध्येही चांगला फायदा मिळतो.
सध्या सुरू असलेल्या CJP प्रोटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी तो भारतात आला आहे. आता पुढे नेमके काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.