शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
23:33 IST

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बालिकाश्रम रोडवर ५५ वर्षांच्या माणसाचा धारदार हत्याराने खून झाला होता. तोफखाना पोलिसांनी सुरज रवी सोनवणे आणि प्रेम उर्फ सोनुल्या रवी सोनवणे यांना अवघ्या २४ तासांत अटक केली.

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अहिल्यानगरमध्ये बालिकाश्रम रोडवरील न्यु आर्ट्स कॉलेजच्या मागच्या गेटसमोर एका ५५ वर्षांच्या माणसावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या धक्कादायक घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. आता तोफखाना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत सुरज रवी सोनवणे आणि प्रेम उर्फ सोनुल्या रवी सोनवणे या दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे.

रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) हे मंधन रवींद्र चव्हाण यांचे वडील. ७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते बालीकाश्रम रोडवरील एशियन फूड कोर्ट हॉटेलसमोरून जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटारसायकलचा आरोपींच्या मोटारसायकलला कट लागला आणि त्यात एका आरोपीची चप्पल तुटली. एवढ्या किरकोळ कारणावरून आरोपींचा राग अनावर झाला.

त्या रागातून आरोपी सुरज रवी सोनवणे, प्रेम उर्फ सोनुल्या सोनवणे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून रवींद्र चव्हाण यांच्या पाठीवर आणि हातावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना जेरबंद केले. आरोपींना तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. हा खून नेमका कशामुळे आणि कसा घडला, याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

बुधवारी दुपारनंतर घडलेल्या या घटनेत जीव गमावलेले रवींद्र चव्हाण हे आमदार संग्राम जगताप यांच्या एका समर्थकाचे वडील होते. त्यामुळे नेमके काय घडले आणि त्यामागचे कारण काय, याची नगरकरांना उत्सुकता होती. फक्त गाडीचा कट लागल्याने कुणाचा खून होऊ शकतो, याचे अनेकांना आश्चर्यही वाटत होते.

मृताच्या नातेवाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार जगताप यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. या पार्श्वभूमीवर आरोपींना २४ तासांत जेरबंद केल्याने समाधान व्यक्त होत आहे. अल्पावधीतच आरोपींना अटक केल्याबद्दल तोफखाना पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ