भद्रावतीत ठेकेदाराचा खून, मजुरी न मिळाल्याच्या रागातून दोन भावांना अटक
भद्रावतीतील नाग मंदिरासमोर बांधकाम ठेकेदाराचा भर रस्त्यात गळा चिरून खून झाल्याची घटना घडली. पोलिसांनी काही तासांतच दोन भावांना या प्रकरणी अटक केली आहे.
भद्रावती-चंद्रपूर शहरात २३ सप्टेंबर रोजी सकाळी नाग मंदिरासमोर एका बांधकाम ठेकेदाराचा भर रस्त्यात खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. उमदेव भावराव मेश्राम (वय ४०, रा. देऊरवाडा, सध्या मुक्काम प्रज्ञा वाचनालयाजवळ, पंचायत समिती परिसर, भद्रावती) असे मृत ठेकेदाराचे नाव आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी काही तासांतच दोन आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी उमदेव हे आपल्या एमएच ३४ क्यू २५१३ क्रमांकाच्या दुचाकीवरून पान टपरीवरून खर्रा घेऊन निघाले होते. त्याचवेळी दोघांनी त्यांची भर रस्त्यात वाट अडवली आणि पैशांबाबत विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आरोपींनी धारदार शस्त्राने उमदेव यांच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उमदेव यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना भररस्त्यात घडल्याने आजूबाजूचे नागरिक साक्षीदार ठरले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी भद्रावती पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आणि काही तासांतच दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे श्रेयश पुल्ली (वय २०) आणि त्याचा भाऊ वैभव पुल्ली (वय २५) अशी आहेत. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की उमदेव मेश्राम हे बांधकाम ठेकेदार होते आणि श्रेयश त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. मात्र उमदेव वेळोवेळी मजुरीचे पैसे देत नसल्याने श्रेयशला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. काम पूर्ण झाल्यावर पैशांची मागणी केली असता उमदेव पैसे देत नव्हता, असे तपासात समोर आले असून यातूनच श्रेयशच्या मनात उमदेव यांच्याविषयी राग निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२३ सप्टेंबर रोजी श्रेयशने आपला सख्खा भाऊ वैभव पुल्लीला सोबत घेऊन नाग मंदिरासमोर उमदेव यांना गाठले. त्यावेळीही दोघा भावांनी पैसे कधी देणार अशी विचारणा केली. उमदेव यांनी आज देतो, उद्या देतो असे उत्तर दिल्यावर श्रेयशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने उमदेव यांच्या मानेवर आणि गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उमदेव यांचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर दोघे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.