नवरात्रीत अदिती सारंगधर म्हणते, सुपरवुमन होण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या
झी मराठीवरील 'सनई चौघडे' मालिकेत तेजस्विनीची भूमिका करणाऱ्या अदिती सारंगधर यांनी नवरात्रीच्या निमित्ताने देवीची रूपं, मातृत्व आणि घर-करिअरचा समतोल यावर मोकळेपणाने मत मांडले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
झी मराठीवरील 'सनई चौघडे' या मालिकेत सध्या जय आणि शरू एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव होत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम जयची आई तेजस्विनी हिच्यावर होणार आहे. ही भूमिका अदिती सारंगधर साकारत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने आईमधलं देवीचं रूप, आजच्या जगात महिलांनी स्वतःला शक्तिशाली कसं ठेवावं आणि आपल्यातली शक्ती कशी ओळखावी, याबद्दल अदिती यांनी खास गप्पा मारल्या.
नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो, मग एका स्त्रीमध्ये या शक्तींचं प्रतिबिंब कसं दिसतं, असं विचारल्यावर अदिती यांनी आपलं परखड मत मांडलं. त्या म्हणाल्या, 'ज्या देवींना आपण वेगवेगळ्या नावांनी पूजतो, तिची अनेक रूपं असतात. सौम्य, लाघवी, रागीट अशा स्त्रीमध्ये प्रत्येकाला ही रूपं वेगवेगळ्या प्रकारे नक्कीच दिसतात. देवीची ही रूपं म्हणजे स्त्रीच्या भावना आहेत आणि त्या वेळोवेळी बाहेर येणं गरजेचं आहे.'
अदिती पुढे म्हणाल्या, 'नवदुर्गा म्हणजे ९ रसांच्या नऊ भावना. अनेकदा महिला या भावना एक्स्प्रेस करायला कचरतात. पण मनातून मोकळं होणं गरजेचं आहे. पारंपरिक खेळांमध्ये खेळला जाणारा भोंडला, गरबा, दांडिया हे सगळं या भावना व्यक्त करण्यासाठीच आहे. पूर्वीच्या काळी महिलांना घराचा उंबरठा ओलांडणं त्रासदायक होतं आणि कोणत्या तरी मार्गाने तिने घराबाहेर यावं म्हणून सण निर्माण झाले. मेंटल हेल्थबद्दल आता खूप जागरूकपणे बोललं जातं, पण आधी ती संकल्पना नव्हती. पूर्वी बायका घरात बांधल्या गेल्या होत्या. काही तासांचा हा आनंद मिळाला की वर्षभर त्या तो आनंद घेऊन जगत होत्या. माझ्यासाठी ही नऊ देवींची ९ रूपं अशाच पद्धतीने प्रतिबिंबित होतात.'
आई ही मुलांसाठी दुर्गेसारखी शक्तिशाली आणि अन्नपूर्णेसारखी मायाळू असते, देवीच्या या रूपांकडे तुम्ही कसं पाहता, असं विचारल्यावर अदिती पटकन म्हणाल्या, 'आताच्या आई अत्यंत रड्या आहेत असं मला वाटतं. कारण पूर्वी इतकी मुलं सांभाळली जायची, पण हे वाईट अर्थाने नाही. धावपळीच्या जगात आपण एकच मूल जन्माला घालतो आणि त्यामुळे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी नेहमी पझेसिव्ह असते.'
त्या असंही म्हणाल्या, 'योग्य वयात लग्न आणि मूल झालं नाही तर भावनांचा विश्वकल्लोळ होतो असं मला वाटतं आणि हा समतोल साधताना नक्कीच दमछाक होते. माझ्यातल्या दुर्गेला असं वाटतं की सनई चौघडे मालिकेतली तेजस्विनी साकारताना जय, गौतम आणि साक्षी ही माझी मुलं आहेत आणि ती त्यानुसार वागत आहे. सोसायटीच्या दृष्टीने ते चुकीचं असेल, पण आईच्या दृष्टीने ते नक्कीच चुकीचं नाही.'
'आई म्हणून जगताना ही सर्व रूपं पाहावी लागतात. प्रत्येक आई मुलाच्या बाबतीत पझेसिव्ह असते. सासू होणार हे लक्षात आल्यावर आनंद होतोच, पण आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार हे फिलींग नक्कीच वेगळं आहे. प्रत्येक आईचं इनसिक्युरीटीचं प्रमाण वेगवेगळं असतं. व्यक्त होण्याची पद्धतही वेगळी आहे. मी तेजस्विनी साकारत आहे, तर मला आई म्हणून ती तिच्या जागी योग्य वाटते. लोकांना ती चुकीची वाटत असली तरी आईच्या दृष्टीने ती अत्यंत योग्य आहे. दुर्गेचं तिचं रूप कोणतं आहे ते लवकरच कळेल.'
आजच्या काळातील स्त्रीसमोर घर आणि करिअरचा समतोल साधण्याचं मोठं आव्हान आहे, त्याबद्दल काय वाटतं, या प्रश्नावर अदिती म्हणाल्या, 'सनई चौघडेचं शूट मी ८-१० दिवसच करते. मुलासाठी जो वेळ आहे तो त्याला योग्य पद्धतीने देते, कारण तो सध्या माझं प्राधान्य आहे. आता कामासाठी स्वतःला खूप जास्त त्रास देऊ शकत नाही. स्वयंपाक करायला आवडतो, पण तो आता जमत नसेल तर तो करण्याची गरज वाटत नाही.'
'मला सुपरवुमन बनायचं आहे या टॅगमागे स्वतःकडे दुर्लक्ष करणं खूपच चुकीचं आहे असं मला वाटतं. जास्तीत जास्त वेळ नवरा आणि मुलाला देण्याचा प्रयत्न करते. माझा आनंद कशात आहे हे आता जास्त महत्त्वाचं वाटतं. माझ्याकडे पर्याय आहेत, तर घर आणि करिअर सांभाळताना चिडचिड कमी करणं, डाएट करणं, स्वतःकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लागणारे पर्याय मी निवडणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.'
स्त्रीने स्वतःसाठी जगणं आणि स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य देणं किती महत्त्वाचं आहे, यावर अदिती पटकन म्हणाल्या, 'मला हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं. पूर्वीच्या काळातली माणसं ग्रेट होती. पण ते जगले म्हणून आपण जगायला पाहिजे असं मला अजिबात वाटत नाही. आपल्याला जे हवं ते करायला आपण मोकळे आहोत. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी जगायला आणि स्वतःच्या स्वप्नांना बळकटी द्यायलाच हवी.'
या नवरात्रीत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणता संदेश द्यावासा वाटतो, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'मला प्रत्येक महिलेला हेच सांगावंसं वाटतं की स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःवर प्रेम करायला शिकलात तर तुम्ही सर्वांना योग्य पद्धतीने सांभाळू शकता. तुम्ही स्वतः त्रासात असाल तर दुसऱ्यांनाही आनंदी ठेवू शकत नाही. कुठल्या तरी व्याधींच्या रूपात आपल्या भावना बाहेर निघतात. भावनांचा निचरा न झाल्यास हे आजार होतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि नको असलेल्या गोष्टी बाहेर काढून या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने स्वतःची काळजी घ्यायलाच हवी, असं मी आवर्जून सांगेन.'
एका शब्दात मातृत्व म्हणजे काय, असा प्रश्न विचारला असता त्यांचं उत्तर होतं, Irreplaceable. मातृत्व हे कधीच पैशाने विकत घेता येत नाही, आईची जागा दुसरं कोणीच कधीच घेऊ शकत नाही, असं मला वाटतं, असं त्या म्हणाल्या. अदिती यांनी आपली मतं परखडपणे आणि स्पष्टपणे मांडत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि सनई चौघडे आवर्जून बघा हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.