गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

'आमने सामने' नाटकाचा वाद: रोहन गुजर आणि केतकी पालव यांचा निर्मात्यांच्या दाव्यावर नवा व्हिडिओ

'आमने सामने' नाटकाचा वाद: रोहन गुजर आणि केतकी पालव यांचा निर्मात्यांच्या दाव्यावर नवा व्हिडिओ छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

निर्मात्यांनी तीन वेळा मानधनवाढ मागितल्याचा दावा केल्यानंतर रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी इन्स्टाग्रामवर नवा व्हिडिओ टाकून आपली बाजू मांडली आहे.

मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या 'आमने सामने' या नाटकातल्या कलाकारांचा वाद गेले काही दिवस चर्चेत आहे. अभिनेता रोहन गुजर आणि केतकी पालव यांना नाटकातून तडकाफडकी काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यांवर केला होता. त्यानंतर निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून रोहन आणि केतकी यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचा दावा केला होता.

आता रोहन आणि केतकी यांनी त्यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. 'आमच्या बाजूने पूर्णविराम..' असे कॅप्शन देऊन त्यांनी हा नवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडिओत दोघे म्हणाले, "आम्ही आमच्या निर्मात्यांचा (लीना भागवत, मंगेश कदम) व्हिडिओ पाहिला. त्यावरच्या कमेंट्सही वाचल्या. नाण्याची दुसरी बाजूही आम्ही ऐकली. पण ती बाजू मांडताना अनवधानाने, चुकून, सोयीस्करपणे किंवा मुद्दामून काही मुद्दे मांडले गेले नाहीत. तेच सांगण्यासाठी आम्ही हा नवा व्हिडिओ करत आहोत. यानंतर असा कोणताही व्हिडिओ करण्याची आम्हालाही अजिबात इच्छा नाही." निर्मात्यांनी तीन वेळा मानधनवाढ हे जितक्या ठामपणे सांगितले, तितक्या ठामपणे ती आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ आहे, हे सांगितले नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही एका वर्षात तीन वेळा पैसे वाढवून मागितले, असा समज झाला आहे, पण तसे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ म्हणजे सरासरी अडीच ते पावणेतीन वर्षांनी एकदा वाढ, असे त्यांनी मांडले. पहिली मानधनवाढ चार वर्षांनी झाली आणि ती अत्यंत किरकोळ होती, हे निर्मात्यांनीही स्वतः मान्य केले, असे त्यांनी सांगितले. दुसरी वाढ सहा वर्षांनी झाली. त्या वेळी नाटक एकदा बंद पडले होते आणि नव्याने सुरू झाले. त्यानंतर चार-एक महिने हाऊसफुल प्रयोग झाले आणि मग आम्ही मानधनवाढीचा प्रस्ताव दिला. सहा वर्षांच्या हिशोबाने जितकी बेसिक वाढ मिळायला हवी, तो आकडा त्यांच्यासमोर ठेवला, असे ते म्हणाले. याबाबतचे सगळे मेसेजेस आपल्याकडेही आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मागण्या सहज मान्य केल्या, हे निर्मात्यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

केतकी यांनी निर्मात्यांचे एक वाक्य वाचून दाखवले : "निर्माता म्हणून मी स्वतः मुरड घालून ही वाढ करत आहे." मुरड घालून म्हणजे मनाविरुद्ध, म्हणजे ही वाढसुद्धा त्यांनी मनापासून केली नव्हती, असे त्या म्हणाल्या. या सात वर्षांत निर्माते कधीच स्वतःहून येऊन बोलले नाहीत की नाटक छान चालले आहे, बुकिंग चांगले आहे, हाऊसफुल होते आहे, तर आता तुमचे पैसे वाढवूया, असे दोघांनी सांगितले. मानधन वाढवून घेताना बुकिंग उतरले तर आम्ही पुन्हा कमी पाकिटात काम करायला तयार होऊ, पण आम्हाला हे नाटक शेवटपर्यंत करायचे आहे, हेही निर्मात्यांना स्पष्ट सांगितल्याचे ते म्हणाले.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात नाटकांसाठी ५० टक्के प्रेक्षकक्षमतेची मर्यादा होती. तेव्हा निर्मात्यांनी ५० टक्के मानधन देण्याचे सांगितले होते आणि आपण लगेच तयार झालो होतो, असे रोहन आणि केतकी यांनी व्हिडिओत म्हटले.

गेली सात वर्षे टीम म्हणून प्रामाणिकपणे काम केले, तरीही मानधनातील दीड हजार रुपयांच्या फरकामुळे आपल्याला रिप्लेस करण्यात आले, असे त्यांचे म्हणणे आहे. याचाच आपल्याला सर्वाधिक त्रास झाला, असे रोहन यांनी भावुक होऊन सांगितले. व्हिडिओच्या शेवटी केतकी पालव यांनीही भावना व्यक्त केल्या. ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आणि नाटकाचे चांगले दिवस पाहिले, त्यांनीच आपल्याला अत्यंत वाईट पद्धतीने बाजूला केले, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

या नव्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका मांडली असून कलाकार आणि प्रेक्षकांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ