लंडनमध्ये कतरिना कैफचा नवा लूक, ट्रोलर्सची बोलती बंद; चाहत्यांची हेअर केअर प्रोडक्ट्सची मागणी
Kay Beauty च्या लंडनमधील वर्षपूर्ती कार्यक्रमात कतरिना कैफचा लूक चर्चेत आहे. तिचे लांब, मोकळे केस पाहून चाहत्यांनी हेअर केअर प्रोडक्ट्स लाँच करण्याची मागणी केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री लंडनमध्ये तिच्या Kay Beauty या ब्युटी ब्रँडच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला गेली होती आणि त्यात तिने घेतलेला लूक सध्या सगळ्यांच्या तोंडी आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिनाने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव विहान ठेवण्यात आले आहे. मुलाच्या जन्मानंतर ती बराच काळ कॅमेऱ्यापासून दूर राहिली. ना विमानतळावरचा लूक, ना कोणता इव्हेंट; ती कुठेच दिसत नव्हती.
गणपतीच्या वेळी ती फक्त एकदाच विकी कौशलसोबत अंबानींच्या घरी आरतीला आली होती. तेव्हा सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करण्यात आले. बाळंतपणानंतर तिच्या वजनावरून अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. ही गोष्ट भाईजानलाही आवडली नाही आणि त्याने ट्रोलर्सची कानउघडणी केली. ट्रोलिंगनंतर फक्त एका महिन्यातच कतरिनाने पुनरागमन करत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.
Kay Beauty हा कतरिनाचा स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे. त्या ब्रँडच्या लंडनमधील वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी ती तिथे गेली होती. तिला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. तिचा लूक पाहून सगळेच थक्क झाले. चेहऱ्यावर तोच जुना ग्लो, एकदम स्टायलिश कपडे आणि मोकळे सुंदर केस पाहून लोक पाहतच राहिले.
त्या दिवशी कतरिनाने चॉकलेट ब्राऊन रंगाचा ड्रेप स्कर्ट घातला होता. त्यावर तिने टेलर ब्लेझर आणि आत ब्लॅक टॉप घातला होता. पायात साधे बेली शूज आणि हातात एक छोटी ब्लॅक बॅग होती. लूक अगदी सिंपल, पण खूपच क्लासी वाटत होता. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते तिच्या केसांनी. फक्त एका महिन्यात तिने स्वतःमध्ये एवढा बदल कसा केला, याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.
तिचे लांब, मोकळे, शायनी केस पाहून लोकांनी तिला लगेच विनंती करायला सुरुवात केली. तिचे फोटो समोर येताच कमेंट्सचा पाऊस पडला. एका फॅनने लिहिले, "कतरिना प्लीज आता ब्युटी प्रोडक्ट्ससोबत हेअर केअर प्रोडक्ट्सही लाँच कर." दुसरा म्हणाला, "ट्रोलर्सना मस्त चपराक बसली आहे." आणखी एकाने लिहिले की, "तिला ट्रोल करण्यापूर्वी लोक विसरले होते की ती कतरिना आहे."
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे पार पडला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांनी गुडन्यूज दिली. त्यांच्या मुलाचे नाव विहान आहे.