७२ वर्षांची प्रतीक्षा संपली: हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे यांना आशियाई टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक
ताश्कंद येथील आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय जोडीने मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले आणि ७२ वर्षांनंतर भारताला या प्रकारात पदक मिळाले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. उझबेकिस्तानातील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. या कामगिरीने दोघांनी इतिहास घडवला आहे.
मिश्र दुहेरीत भारताला पदक मिळण्यासाठी तब्बल ७२ वर्षे वाट पाहावी लागली. या यशामुळे हरमीत आणि यशस्विनी हे या स्पर्धेत पदक जिंकणारी तिसरी भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरले आहेत.
उपांत्यपूर्व फेरीत या जोडीसमोर मोठे आव्हान उभे होते. सामन्यात हरमीत आणि यशस्विनी १-२ ने मागे पडले होते आणि स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका त्यांच्यासमोर होता. तरीही दोघांनी हार न मानता जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याचे चित्रच पालटून टाकले. निर्णायक गेममध्ये त्यांनी उत्तम समन्वय दाखवला आणि सामना ३-२ ने जिंकला. या विजयामुळे त्यांनी उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली आणि भारतासाठी पदकही निश्चित झाले.
उपांत्य फेरीत मात्र जपानच्या जोडीचे आव्हान भारतीय जोडीला पेलवले नाही. जपानच्या सोरा मात्सुशिमा आणि मिवा हारिमोटो यांनी ११-९, ११-९, ११-८ असे तिन्ही सेट जिंकून भारतीय जोडीला पराभूत केले. जपानकडून पराभव झाल्याने हरमीत आणि यशस्विनी यांचा पुढचा प्रवास तिथेच संपला आणि त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तरीही त्यांच्या या यशाने भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिश्र दुहेरीतील शेवटचे पदक १९५४ मध्ये मिळाले होते. तेव्हा सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत यतीन आणि मीना या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर भारतीय टेबल टेनिसला या प्रकारात पदकासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. आता ७२ वर्षांनंतर हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे यांनी कांस्यपदक जिंकून हा दुष्काळ संपवला आहे.
याच स्पर्धेच्या इतिहासात १९५२ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये गुल नाशिकवाला आणि कल्याणपूर जयंत या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.