गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

२५० सीसीटीव्हींचा माग, दहा दिवसांचा शोध; सराईत आरोपीचा पाठलाग करून पोलिसांनी केली अटक

२५० सीसीटीव्हींचा माग, दहा दिवसांचा शोध; सराईत आरोपीचा पाठलाग करून पोलिसांनी केली अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

पायी जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला चतुःशृंगी पोलिसांनी हडपसर परिसरात पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे : पायी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या सराईत आरोपीला चतुःशृंगी पोलिसांनी दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अटक केली आहे. शहरातील विविध भागांतील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी त्याचा माग काढला. हडपसर परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४) असे आहे. तो लेन क्रमांक ४, आर्वी गाव, साई रोड, जि. लातूर येथे राहतो, तर त्याचे मूळ गाव एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर हे आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शितल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या पथकाने केली आहे.

या प्रकरणाची सुरुवात गेल्या महिन्यात, म्हणजे २० ऑक्टोबर २०२६ रोजी, सकाळी साधारण नऊच्या सुमारास झाली. तक्रारदार त्या वेळी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले, अशी तक्रार आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सलग दहा दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर या भागांतील २५० हून अधिक कॅमेऱ्यांचे चित्रण पाहून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरातून पाठलाग करून आरोपीला पकडण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जबरी चोरी करून हिसकावलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुचाकी आणि चोरीचा मुद्देमाल मिळून एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

७० हून अधिक गुन्ह्यांची नोंद : अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक आणि सातारा या ठिकाणी जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ