नागपूर सायबर पोलिसांचे तीन राज्यांत छापे, कोट्यवधींच्या ऑनलाइन फसवणुकीत आठ आरोपी अटकेत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चार स्वतंत्र प्रकरणांच्या तपासात नागपूर सायबर पोलिसांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले. एकूण आठ आरोपींना अटक झाली असून काहींचे धागेदोरे हाँगकाँग आणि दुबईतील नेटवर्कशी जोडलेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग वापरून लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळ्यांविरुद्ध नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार स्वतंत्र प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले आणि एकूण आठ आरोपींना अटक केली.
यातील पहिले प्रकरण शेअर ट्रेडिंगच्या नावाने झालेल्या २.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आहे. या प्रकरणात मुंबईतील बोरिवली येथून दोघांना अटक झाली. या टोळीचे धागेदोरे हाँगकाँग आणि दुबईतील सायबर फसवणूक नेटवर्कशी जोडलेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरात आणि टेलिग्राम समूहामार्फत बनावट 'एफटीएमओ' ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आले. त्यानंतर ३३ वेगवेगळ्या व्यवहारांतून त्यांच्याकडून २.८७ कोटी रुपये गुंतवून घेण्यात आले आणि फसवणूक झाली. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील काकासाहेब मोहन दरुंडे याला पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तो वेगवेगळ्या खासगी कंपन्यांची चालू कॉर्पोरेट बँक खाती हाताळायचा आणि ती सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना उपलब्ध करून द्यायचा, असे तपासात उघड झाले.
दरुंडेकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे पथक मुंबईतील बोरिवली परिसरात सहा दिवस तळ ठोकून होते. एका आरोपीला फूड डिलिव्हरीचे पार्सल आल्याचे सांगून घराबाहेर बोलावण्यात आले. मग बोरिवली पोलिसांच्या मदतीने राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथील भूपेंद्र महावीर जैन (३२) आणि योगेश पारसमल जैन (३७) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात असेही दिसले की फसवणुकीची रक्कम आरबीएल बँकेच्या एका कॉर्पोरेट खात्यातून अवघ्या २४ सेकंदांत ३९ व्यवहारांनी ३८ बँक खात्यांत वळवण्यात आली. इंटरनेट बँकिंगसाठी वापरलेल्या मोबाइल क्रमांकाचे सिमकार्ड आणि मोबाइल संचही आरोपींकडून मिळाले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींचा हाँगकाँग आणि दुबईतील सायबर फसवणूक नेटवर्कशी संपर्क असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला डिजिटल अटकेची भीती दाखवण्यात आली आणि १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे. दिनेश अंबाभाई रावरिया (३२, रा. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई) आणि अरविंद कानजी गाला (४५, रा. ताडदेव रोड, मुंबई) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त केले. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणातील फसवणूक झालेल्या व्यक्तीला ८ लाख ५० हजार रुपये परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.