बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिलेचा खून; संशयित संतोष धोत्रे अटकेत

वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिलेचा खून; संशयित संतोष धोत्रे अटकेत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

अहिल्यानगरमधील भिंगार परिसरात ग्रामपंचायतीच्या सफाई कामगार महिलेच्या खुनाप्रकरणी संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी अटक केली आहे.

अहिल्यानगरमधील भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. २७) सकाळी एका महिलेच्या डोक्यात पाण्याचा लोखंडी वॉल मारून तिचा खून झाल्याची घटना घडली. ही घटना ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचांच्या दालनात घडली असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव अनिता देविदास आळकुटे (वय ४२, रा. तागडकरवस्ती, वडारवाडी, भिंगार) असे आहे. या प्रकरणी संशयित संतोष नाना धोत्रे (रा. वडारवाडी) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अनिता यांचा मुलगा योगेश देविदास आळकुटे (वय २६) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिता गेली सुमारे २० वर्षे वडारवाडी ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. संतोष धोत्रे ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवर काम करत असल्याने दोघांची एकमेकांशी ओळख होती.

फिर्यादीतील नोंदीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी अनिता यांनी मुलाला सांगितले होते की संतोष धोत्रे आपल्यावर प्रेम असल्याचे वारंवार सांगतो आणि आपण नकार दिल्यामुळे विनाकारण त्रास देतो. त्यानंतर योगेश आणि अनिता यांनी संतोषला समजावून सांगितले होते.

शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास अनिता बिगारी कामासाठी जात असताना कावेरी हॉस्पिटलजवळ संतोषने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे त्यांनी घरी आल्यावर मुलाला सांगितले होते. त्यावेळीही संतोषला समजावून सांगण्यात आले, पण त्यावेळी पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अनिता नेहमीप्रमाणे कामासाठी वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. सकाळी १०.१८ वाजता योगेश घरी असताना त्यांचे चुलत मामा सूरज तागडकर यांचा फोन आला. ग्रामपंचायत कार्यालयात लवकर ये, संतोष धोत्रे याने तुझ्या आईचा खून केला आहे, असे त्यांनी फोनवर सांगितले.

ही माहिती मिळताच योगेश यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. तेथील सरपंचांच्या कार्यालयात त्यांची आई डोक्याला गंभीर जखम होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्त लागलेला पाण्याचा लोखंडी वॉल पडलेला होता.

आईला एकतर्फी प्रेमातून त्रास दिला जात होता आणि यापूर्वी तिला मारहाणही झाली होती, असे योगेश यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. संतोष धोत्रे याने आईच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कॅम्प पोलीस करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ