१३ नोव्हेंबर २०२६ ला जगाचा अंत? १९६० च्या लोकसंख्या अभ्यासाचा चुकीचा अर्थ
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोशल मीडियावर १३ नोव्हेंबर २०२६ ला जग संपणार असे दावे फिरत आहेत. मूळ शोधनिबंध लोकसंख्या वाढीच्या गणितावर होता, पृथ्वीच्या विनाशावर नाही.
सध्या सोशल मीडियावर एक दावा खूप फिरतो आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण जगाचा अंत होणार, असे सांगणारे अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि बातम्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. सुमारे ६६ वर्षांपूर्वी जगातील नामांकित वैज्ञानिकांनीच याच तारखेला महाविनाश होईल असे भाकीत केले होते, असेही त्यात म्हटले जाते. त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाटणे साहजिक आहे. मग यामागचे खरे सत्य काय आहे?
या सगळ्याची सुरुवात ४ नोव्हेंबर १९६० रोजी झाली. अमेरिकेतील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'सायन्स' (Science) या विज्ञान मासिकात त्या दिवशी एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याचे शीर्षक होते "Doomsday: Friday, 13 November, A.D. 2026", म्हणजेच प्रलय: शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६. शीर्षक लक्ष वेधून घेणारे आणि काहीसे भीतीदायक होते.
हा शोधनिबंध ऑस्ट्रियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ हाइन्झ फॉन फोर्स्टर (Heinz von Foerster) यांनी लिहिला. त्यांच्यासोबत पॅट्रिशिया मोरा आणि लॉरेन्स एमियट हे संशोधक होते. हे सर्वजण अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात काम करत होते.
या संशोधकांनी ख्रिस्ती युगाच्या सुरुवातीपासून १९५८ पर्यंतच्या मानवी लोकसंख्येच्या तब्बल २४ ऐतिहासिक अंदाजांचा अभ्यास केला. लोकसंख्या कशी वाढते आणि पुढे तिचा वेग कसा राहील, हे समजून घेण्यासाठी त्यांनी एक गणितीय मॉडेल तयार केले. त्यात त्यांना दिसले की लोकसंख्या सरळ किंवा स्थिर दराने वाढत नाही. तिचा वेग काळानुसार वाढत जातो. याला 'हायपरबोलिक ग्रोथ' (Hyperbolic Growth) म्हणतात.
संशोधकांच्या मते मानवामध्ये एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्य करण्याची आणि तंत्रज्ञान वापरून संघटित होण्याची वेगळी क्षमता आहे. त्यामुळे निसर्गाच्या मर्यादांवर मात करून लोकसंख्या वेगाने वाढू शकली. याच समीकरणावरून त्यांनी निष्कर्ष काढला की वाढीचा हाच वेग टिकला, तर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी जगाची लोकसंख्या 'अनंत' (Infinite) होईल.
शीर्षक वाचून त्या दिवशी पृथ्वीवर काहीतरी मोठे संकट येणार, असे वाटू शकते. पण या संशोधनात पृथ्वीच्या प्रत्यक्ष विनाशाचा कुठेही उल्लेख नव्हता. मोठा लघुग्रह (Asteroid) आदळेल, प्रचंड भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होईल किंवा महाप्रलय येईल, असा कोणताही दावा शास्त्रज्ञांनी केला नव्हता.
'Doomsday' आणि 'Singularity' हे शब्द एका काल्पनिक गणितीय परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरले गेले होते. गणितात 'सिंग्युलॅरिटी' म्हणजे असा बिंदू, जिथे समीकरणाचे उत्तर अनंत येते. प्रत्यक्ष जगात मात्र पृथ्वीवरील संसाधने मर्यादित आहेत. पिण्याचे पाणी, अन्नधान्य उत्पादनाची मर्यादा आणि पर्यावरणाचा समतोल पाहता मानवी लोकसंख्या कधीच अनंत होऊ शकत नाही. त्यामुळे १९६० च्या या लोकसंख्येच्या मॉडेलला जगाच्या अंताचे भाकीत मानणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.
हा विषय पुन्हा चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे एका जुन्या वृत्तपत्रातील लेख. २९ नोव्हेंबर १९६४ रोजी इजिप्तमधील 'वतनी' (Watani) या वृत्तपत्रात लेखक मिशेल टेकला (Michel Tackla) यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचे शीर्षकही १३ नोव्हेंबर २०२६ या तारखेशी आणि जगाच्या अंताशी जोडलेले होते. अलीकडे या जुन्या कात्रणाचा (Clipping) फोटो व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात फिरला. त्याचा आधार घेऊन काही लोकांनी सौर हालचाली (Solar Activity), हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती यांचा या तारखेशी संबंध जोडायला सुरुवात केली.
सूर्यावर नियमितपणे होणाऱ्या सौर ज्वाला (Solar Flares) आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो, हे खरे आहे. त्यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी, सॅटेलाइट कम्युनिकेशन, जीपीएस (GPS) आणि पॉवर ग्रिडमध्ये काही काळ अडथळे येऊ शकतात. पण खगोलशास्त्रज्ञांच्या मते या हालचालींमुळे संपूर्ण पृथ्वी किंवा मानवजात नष्ट होण्याची शक्यता नसते. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ इमाद मुजाहिद यांनी स्पष्ट सांगितले की १३ नोव्हेंबर २०२६ रोजी पृथ्वीला धोका निर्माण करेल अशी कोणतीही खगोलीय घटना घडणार नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.