लॉस एंजेलिसच्या महापौरपदी नित्या रमण; निकालांवर ट्रम्प यांचा निवडणूक प्रणालीवर आक्षेप
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टनमध्ये रिपब्लिकन उमेदवार हरले. नित्या रमण महापौर झाल्या, तर ट्रम्प यांनी निकालांना लज्जास्पद म्हटले.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालांमुळे तिथल्या राजकारणात सध्या मोठी हलचल सुरू आहे. लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टन डीसी या महत्त्वाच्या शहरांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच निवडणुकीत भारतीय वंशाच्या नित्या रमण यांनी लॉस एंजेलिसच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली.
या पराभवांनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रणालीवर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उभे केले असून हे निकाल अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अप्रामाणिक आहे. लॉस एंजेलिसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्पेन्सर प्रॅट सहज जिंकतील असा विश्वास होता, पण निकाल पूर्णपणे उलटे लागले, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेतील निवडणुका आता इतक्या अप्रामाणिक झाल्या आहेत की सामान्यांना त्याची कल्पनाच नाही. इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास हे देशासाठी एक मोठे संकट ठरू शकते." याच वेळी त्यांनी न्यूयॉर्कमधील राजकीय परिस्थितीचा आणि आपले कट्टर विरोधक तसेच डेमोक्रॅट नेते झोहरान ममदानी यांच्याशी असलेल्या संबंधांचाही पुन्हा उल्लेख केला.
वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार जेनेस लुईस जॉर्ज यांनी महापौरपद मिळवले. तर लॉस एंजेलिसमध्ये नित्या रमण यांनी बाजी मारली. निकाल जाहीर झाल्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या (DOJ Civil Rights Division) प्रमुख हरमीत ढिल्लन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ढिल्लन या ट्रम्प प्रशासनाच्या अगदी जवळच्या मानल्या जात होत्या. एकीकडे प्रशासनातला हा राजीनामा आणि दुसरीकडे मोठ्या शहरांतला पक्षाचा पराभव, यामुळे रिपब्लिकन पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
नित्या रमण यांनी महापौरपदी निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. लॉस एंजेलिससारख्या अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या शहराचे नेतृत्व करायला मिळणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
विजयानंतर रमण यांनी शहराच्या मावळत्या महापौर करेन बास यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. अनेक दशके बास यांनी शहरासाठी केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभारही मानले. रमण म्हणाल्या, "महापौर बास यांच्या योगदानाशिवाय लॉस एंजेलिस आज जसे आहे तसे नसते. पुढे अनेक आव्हाने आहेत आणि बदलाला थोडा वेळ नक्कीच लागेल, पण आम्ही सगळे मिळून या शहराचे भविष्य अधिक उज्ज्वल करू." आपल्या संदेशाच्या शेवटी त्यांनी "धन्यवाद एलए, चला कामाला लागूया!" असे म्हणत नव्या कारकिर्दीची सुरुवात केली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.