बारावी ॲग्रीकल्चरनंतर कोणते कोर्स निवडायचे? सरकारी, खाजगी आणि संशोधन क्षेत्रात संधी
बारावीत ॲग्रीकल्चर घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. ॲग्रीकल्चरसह अनेक कोर्स उपलब्ध आहेत. सरकारी नोकरी, खाजगी कंपन्या, संशोधन आणि स्वतःचा व्यवसाय असे पर्याय त्यातून खुले होतात.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजच्या काळात ॲग्रीकल्चरचे क्षेत्र फक्त शेतीपुरते राहिलेले नाही. ते मोठे कॉर्पोरेट आणि संशोधनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावीत ॲग्रीकल्चर हा विषय निवडतात.
बोर्डाची परीक्षा पास झाल्यावर पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनेकदा पडतो. नोकरीच्या कोणत्या संधी मिळतील, हीच त्यांची चिंता असते. बारावीला ॲग्रीकल्चर स्ट्रीम घेतली असेल, तर देशात आणि परदेशात करिअर करण्यासाठी अनेक चांगले पर्याय समोर आहेत.
या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय कोर्स म्हणजे बी.एस्सी. ॲग्रीकल्चर. हा चार वर्षांचा प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम आहे. आवडीनुसार बी.एस्सी. हॉर्टिकल्चर, बी.एस्सी. फॉरेस्ट्री, बी.टेक ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, बी.एस्सी. डेअरी टेक्नॉलॉजी किंवा बी.एफ.एस.सी (BFSC) हेही कोर्स निवडता येतात. या कोर्सेसच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर CUET-UG घेतली जाते. राज्य पातळीवरही वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा होतात. त्यातून देशातील टॉप ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळतो.
कृषी क्षेत्रातली पदवी पूर्ण झाल्यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत सरकारी नोकऱ्यांच्या मोठ्या संधी असतात. बँकिंग क्षेत्रात IBPS SO च्या माध्यमातून दरवर्षी ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरची भरती होते. एसएससी (SSC) आणि राज्य लोकसेवा आयोगांमार्फत कृषी विकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आणि सॉयल कॉन्झर्वेशन ऑफिसर या पदांवर नियुक्त्या केल्या जातात. भारतीय अन्न महामंडळ (FCI) आणि NABARD सारख्या मोठ्या संस्थांमध्येही ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट्ससाठी दरवर्षी प्रशासकीय आणि तांत्रिक पदे निघतात.
खाजगी क्षेत्रातही ॲग्रीकल्चर प्रोफेशनल्सना मोठी मागणी आहे. देश-विदेशातल्या मोठ्या फर्टिलायझर कंपन्या, बियाणे बनवणाऱ्या कंपन्या आणि कीटकनाशके तयार करणाऱ्या फर्म्स ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट्सना सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिसर्च असोसिएट आणि क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर म्हणून नेमतात. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, डेअरी फार्म्स, कोल्ड स्टोरेज चेन आणि अॅग्रो-केमिकल इंडस्ट्रीजमध्येही चांगल्या सॅलरी पॅकेजवर काम करण्याची संधी मिळते.
अभ्यास आणि संशोधनात रस असेल, तर बी.एस्सी. नंतर एम.एस्सी. आणि पीएचडी करून कृषी वैज्ञानिक होता येते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक रिसर्च सेंटर्समध्ये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वैज्ञानिक आणि प्राध्यापकांची मोठी गरज असते.
स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचीही संधी या क्षेत्रात आहे. केंद्र सरकारच्या कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र यांसारख्या योजनांची मदत घेऊन तरुण सॉयल टेस्टिंग लॅब म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करू शकतात. ऑरगॅनिक फार्मिंग कन्सल्टन्सी किंवा अॅग्रो-टुरिझमचा व्यवसाय सुरू करूनही चांगली कमाई करता येते.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.