शेवगावात हजारो झाडांची कत्तल, दहा दिवसांनंतरही वनविभागाची कारवाई गुलदस्त्यात
शेवगाव तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड उघड होऊन दहा दिवस झाले, तरी दोषींवर काय कारवाई झाली हे वनविभाग सांगत नाही. पर्यावरणप्रेमी संतप्त आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल झाल्याचे प्रकरण उघडकीस येऊन आता दहा दिवस उलटले आहेत. तरीही दोषींवर नेमकी काय कायदेशीर कारवाई झाली, याचा पत्ता वनविभागाने लागू दिलेला नाही. वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि लाचखोर कर्मचारी यांच्या संगनमताने ही झाडे तोडली गेली, असा आरोप आहे आणि हा प्रकार पुराव्यानिशी समोर आणला गेला आहे.
यात सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे, पर्यावरण वाचवण्यासाठी शासकीय पातळीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अहिल्यानगरच्या उपवनसंरक्षक कार्यालयाकडूनच मोठे आकर्षक फलक लावले गेले आहेत. त्यावर लिहिले आहे, 'एक झाड लावा.. 50 वर्षांनंतर ते झाड आपल्याला किती उपयोगी पडते ते माहिती करून घ्या'. या पोस्टरांमधून एका झाडाचे महत्त्व सांगितले जाते. एक झाड 15 लाख रुपयांचे ऑक्सिजन देते, 40 लाख रुपयांचे पाणी रिसायकल करते आणि 35 लाख रुपयांच्या किमतीइतके वायू प्रदूषण रोखते, असे त्यात म्हटले आहे. शिवाय पक्ष्यांना आश्रयही झाडच देते, असेही सांगितले आहे.
लोकांना असे गोड धडे देणाऱ्या याच वनविभागाच्या कार्यालयात काही जणांचे उखळ पांढरे होत असल्याचे आता उघड झाले आहे. ही दांभिकता चव्हाट्यावर आली आहे.
हा प्रकार बाहेर आल्यावर वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने चौकशी आणि कारवाईचे आदेश दिल्याचा आव आणला. पण दहा दिवस झाले तरी दोषी अधिकाऱ्यांवर नेमकी कारवाई झाली का, याबद्दल विभागाने कमालीची गोपनीयता पाळली आहे. प्रसारमाध्यमांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विचारणा केली, तरी अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.
वृक्षतोड करणारे तस्कर आणि लाचखोर यांच्याकडून मलिदा लाटला गेल्यामुळेच या प्रकरणावर पडदा टाकण्याचा डाव रचला जात आहे, असा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. सरकारी रक्षकच भक्षक झाले, तर सामान्य माणसाने दाद मागायची कुणाकडे, असा संतप्त सवाल शेवगाव तालुक्यातून विचारला जात आहे. वरिष्ठ पातळीवरचे काही अधिकारी या भ्रष्ट सहकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, वनप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते या घटनेमुळे तीव्र आक्रमक झाले आहेत. आज ऑक्सिजनच्या अभावी लाखो लोक जीव गमावत असताना, आयुष्यभर प्राणवायू देणाऱ्या हजारो डेरेदार वृक्षांचा घास घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नुसत्या निलंबनाची खानापूर्ती कारवाई करून चालणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. झाडांच्या कत्तलीमुळे अप्रत्यक्षपणे माणसाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दोषींवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे.
एकीकडे जाहिरातबाजीचा देखावा करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच आशीर्वादाने लाखो-करोडोंची संपत्ती असलेल्या मुक्या झाडांची लाकूड माफियांसोबत मिळून कत्तल होऊ द्यायची, या दुटप्पी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. आता अहिल्यानगरचे मुख्य वनसंरक्षक आणि जिल्हा प्रशासन कोणती कठोर भूमिका घेणार आणि दोषी अधिकाऱ्यांवर बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.