मुळा-मुठा नदीत पावसाळ्यानंतरही प्रदूषणाचा परिणाम कायम, आघारकर संस्थेच्या अभ्यासात उघड
आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार सांडपाण्यामुळे मुळा-मुठा नदीतील सूक्ष्मजीवांची रचना बदलली असून पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहानंतरही ती पूर्ववत होत नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील सांडपाणी आणि प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीतील सूक्ष्मजीवांची नैसर्गिक रचना बदलत चालली आहे. पावसाळ्यात नदीला मोठा प्रवाह आला तरी ही परिस्थिती पूर्ववत होत नाही, असे पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. नदीतील सूक्ष्म शेवाळाचा अभ्यास करताना संशोधकांना हा निष्कर्ष मिळाला. नैसर्गिक प्रवाहामुळे प्रदूषके वाहून जात असली, तरी शहरातील प्रदूषणाचा परिणाम नदीतील जैवविविधतेवर तसाच राहतो, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
उष्णकटिबंधीय नद्यांमध्ये मोसमी पूर आला की प्रदूषके वाहून जातात आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचे नैसर्गिक मिश्रण पुन्हा प्रस्थापित होते, असे आधीच्या संशोधनांत दिसले होते. पण मुळा-मुठा नदीच्या बाबतीत पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहाचा परिणाम मर्यादित असल्याचे या अभ्यासात दिसले. पुरामुळे सूक्ष्मजीवांच्या रचनेत काही काळ बदल होतो, मात्र कोणत्या प्रजाती टिकणार हे प्रदूषणाची पातळी ठरवते.
संशोधक प्रत्याशा नायक आणि डॉ. बालासुब्रमनियन कार्थिक यांनी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत नदीच्या उगमक्षेत्रापासून शहरी आणि औद्योगिक भागापर्यंत १७ ठिकाणांहून नमुने गोळा केले. त्यात पाण्याचे नमुने होते, तसेच दगडांवर साचलेल्या जैविक थराचेही नमुने होते. या नमुन्यांच्या आधारे त्यांनी डायटम्स या एकपेशीय सूक्ष्म शेवाळांचा अभ्यास केला. डायटम्सच्या पेशीभोवती सिलिकाचे कवच असते. पर्यावरणातील बदलांना हे सूक्ष्मजीव संवेदनशील असल्याने पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. म्हणूनच नदीतील प्रदूषणाचा परिसंस्थेवर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी डायटम्सचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
संशोधनात असे आढळले की नदीतील एखाद्या ठिकाणी सापडणाऱ्या डायटम्सच्या प्रजातींची एकूण विविधता वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुलनेने स्थिर राहते. मात्र नदी उगमक्षेत्राकडून शहरी भागाकडे जाताना प्रजातींच्या रचनेत मोठे बदल झाले. स्वच्छ पाणी आणि विरघळलेला ऑक्सिजन जास्त असलेल्या उगमाच्या परिसरात पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती सापडल्या. शहरी भागात सांडपाणी आणि पोषकद्रव्ये वाढल्याने या संवेदनशील स्थानिक प्रजाती कमी झाल्या. त्यांच्या जागी प्रदूषण सहन करू शकणाऱ्या प्रजाती वाढल्याचे संशोधकांना दिसले.
सूक्ष्मजीवांच्या रचनेतील या बदलांमागे पाण्याची विद्युत वाहकता आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे मुख्य रासायनिक घटक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढले की विद्युत वाहकता वाढू शकते. तसेच सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणातील बदलांना संवेदनशील असलेल्या स्थानिक प्रजातींच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.
नदीचे संवर्धन करायचे असेल तर फक्त नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे पुरेसे नाही. शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पाण्याच्या गुणवत्तेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे. नदीतील स्थानिक जैवविविधता टिकवायची असेल तर प्रवाह व्यवस्थापनासोबतच प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहानंतरही सूक्ष्मजीवांची नैसर्गिक रचना पूर्ववत होत नाही, हा निष्कर्ष नदी संवर्धनासाठी प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.