मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
04:10  वाकडमध्ये १८ व्या मजल्यावरून पडून आई आणि सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू, चिठ्ठी जप्त 02:10  वाकडजवळ हायवेच्या कामात पंधरवड्यात तीनदा भूमिगत केबल तुटल्याचा आरोप; ४०,००० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 01:30  बारामतीत एका रात्रीत १५८ मिलिमीटर पाऊस, रस्ते पाण्याखाली; नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी 2 नोव्ह | 20:10  वाकडमध्ये १८ व्या मजल्यावरून आई आणि सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू, ७-८ पानी चिठ्ठी सापडली 10:56  हिंजवडी-माण-मारुंजी रस्त्यांसाठी भूसंपादनाला वेग, टीडीआरची प्रक्रिया महिनाभरात करण्याचे आदेश 2 नोव्ह | 23:07  पुणेकरांनो, दिवाळीनंतर शहरात एक दिवस आड पाणी; कोट्यातील निम्मे पाणी आधीच संपले
सर्व थेट अपडेट

पुण्यात विवाहिता पायल झांबरे मृत; पतीसह चौघांवर स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात विवाहिता पायल झांबरे मृत; पतीसह चौघांवर स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

मुकुंदनगरमधील 29 वर्षीय पायल पवार-झांबरे हिच्या मृत्यूनंतर भावाच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

पुण्यातील मुकुंदनगर परिसरात राहणारी 29 वर्षांची विवाहित तरुणी पायल पवार-झांबरे हिच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सासरच्या कुटुंबाच्या जुन्या फ्लॅटमध्ये तिने गळफास लावून जीवन संपवले. मृत्यूच्या आदल्या रात्री तिने भावाला टेक्स्ट मेसेज केला होता आणि त्यानंतर तिचा फोन बंद झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

पायलचा भाऊ ऋषीकेश पवार यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत त्या रात्रीचा आणि त्याआधीचा घटनाक्रम सविस्तर सांगितला आहे. त्यांच्या जबाबावरून स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती अक्षय अरविंद झांबरे, तसेच सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

फिर्यादीनुसार, दिवाळी सणाला माहेरून 10 तोळे सोनं घेऊन यावं, यासाठी पायलचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता. याच छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पायलला 30 मार्च 2023 रोजी मुलगी झाली. त्यानंतर सासरची मंडळी रुग्णालयात गेली आणि तिथे वाद घातला. "आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही," असे म्हणून ते तिथून निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतरही मुलगी झाली म्हणून तिला वारंवार घालूनपाडून बोलणे, शिवीगाळ करणे आणि शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरूच होते, असा आरोप आहे.

घटनेच्या दिवशी, म्हणजे 1 नोव्हेंबर 2026 ला पायल माहेराहून सासरी परतली होती. रात्री 9.18 वाजता तिने भाऊ ऋषीकेश यांना मोबाईलवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला. त्यात तिने "माझी सासू जबाबदार आहे" असे लिहिले होते. मेसेज वाचताच भावाने तिच्या फोनवर संपर्क साधला, पण तिने फोन उचलला नाही. मग त्यांनी तिच्या पतीला फोन केला. तेव्हा पतीने उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली आणि घरच्या भांडणात पडू नका, असे सांगून फोन कट केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पायलच्या माहेरच्या लोकांनी रात्री उशिरापर्यंत सासरच्या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांचे फोन बंद लागत होते. पहाटे सासरच्या मंडळींनी स्वतः फोन करून पायल घरी आली नसल्याचे कळवले. त्यामुळे संशय आल्याने माहेरचे लोक मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथील सासरच्या घरी पोहोचले आणि पायलबद्दल विचारपूस केली. तिथे कुणीच तिच्याबद्दल काही सांगितले नाही. शेवटी पती अक्षय याने पायल समोरच्या फ्लॅटमध्ये असेल, असे म्हटले.

त्यानंतर पतीसह माहेरची सर्व मंडळी त्या फ्लॅटवर गेली. पण दरवाजा आतून बंद होता. म्हणून भाऊ ऋषीकेश यांनी मागच्या गॅलरीतील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा उघडला. सगळ्यांनी किचनमध्ये पाहिले, तेव्हा पायलने सिलिंगच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांच्या मदतीने तिला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ