मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मुकुंदनगरमध्ये ३४ वर्षीय विवाहितेने गळफास घेतला; पती, सासू, सासरे, नणंदेवर गुन्हा

मुकुंदनगरमध्ये ३४ वर्षीय विवाहितेने गळफास घेतला; पती, सासू, सासरे, नणंदेवर गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

पुण्यातील मुकुंदनगर भागात पायल झांबरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भावाच्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ३४ वर्षांच्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पायल झांबरे असे त्यांचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून सतत होणारा हुंड्याचा आणि मानसिक छळ सहन न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. दिवाळीला माहेरून १० तोळे सोने आणावे, या मागणीवरून त्यांचा छळ सुरू होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पायल यांचे पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे हे गुन्हे आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पायल यांचा भाऊ ऋषीकेश पवार यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पायल यांचे लग्न १३ मार्च २०१९ रोजी अक्षय अरविंद झांबरे यांच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाले होते. त्या लग्नात माहेरच्यांनी आपल्या क्षमतेबाहेर जाऊन ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये रोख दिले होते. हुंडा एकूण ७० ते ८० लाख रुपयांचा होता. तरीही लग्नानंतर काही महिन्यांतच सासरचा खरा चेहरा दिसू लागला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सासू मंगल झांबरे आणि पती अक्षय हे प्रत्येक सणाला माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी पायल यांना सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होते, असा आरोप आहे.

छळ फक्त पैशांपुरता नव्हता. ३० मार्च २०२३ रोजी पायल यांना मुलगी झाली. मुलगा हवा होता, या हट्टापायी सासरचे लोक थेट रुग्णालयात गेले आणि तिथे वाद घातला. "आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही," असे म्हणून ते निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतरही मुलगी झाल्यावरून त्यांना वारंवार टोमणे मारणे आणि शिवीगाळ करणे सुरूच राहिले, असे सांगितले जाते.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी पायल माहेरून सासरी परतल्या. तिथे पोहोचल्यानंतर रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी त्यांनी भाऊ ऋषीकेश यांना मोबाईलवर मेसेज पाठवला. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले होते, "माझी सासू जबाबदार आहे." मेसेज वाचताच घाबरलेल्या भावाने त्यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. मग भावाने पायल यांच्या पतीला फोन केला. त्यावर पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि "घरच्या भांडणात पडू नका," असे सांगून फोन कट केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

रात्री उशिरापर्यंत पायल यांच्या माहेरच्यांनी सासरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांचे फोन बंद लागत होते. पहाटे सासरच्यांनी फोन करून पायल घरी आल्या नसल्याचे सांगितले. संशय आल्याने माहेरचे लोक मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथे सासरच्या घरी गेले. तिथे विचारपूस केली, तेव्हा कोणीच काही सांगत नव्हते. शेवटी पती अक्षय यांनी पायल समोरच्या जुन्या फ्लॅटमध्ये असतील, असे सुचवले.

त्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. म्हणून फिर्यादी भावाने मागच्या गॅलरीतील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला. किचनमध्ये पाहिले असता, पायल यांनी छताच्या कडीला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ