ऐश्वर्य ठाकरे यांच्या खात्यातून परदेशातून सहा व्यवहार, १९,०१५ रुपये गायब
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून परदेशातून सहा व्यवहार झाले. छत्रपती संभाजीनगरमध्येही एका वृद्ध नागरिकाच्या खात्यातून ७ लाख ३० हजार ४६३ रुपये वळते झाले.
आजकाल सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. ओटीपी दिला नाही किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही, तरीही खात्यातून पैसे गहाळ होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. आता शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव व स्मिता ठाकरे यांचे चिरंजीव ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
३० ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास ऐश्वर्य ठाकरे यांच्या खात्यातून एकापाठोपाठ एक असे सहा संशयास्पद व्यवहार झाले. या सहा व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून एकूण १९,०१५ रुपये डेबिट म्हणजेच कमी झाले. विशेष म्हणजे, हे सर्वच्या सर्व व्यवहार परदेशातून झाल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच ऐश्वर्य ठाकरे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्यवहार करण्यासाठी कार्ड क्लोनिंग झाले, खात्याची माहिती चोरीला गेली की आणखी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
दरम्यान, ऐश्वर्य ठाकरे यांनी अनुराग कश्यप दिग्दर्शित "निशांची" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सायबर फसवणुकीमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.
मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधूनही अशीच एक मोठी सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. शहरातील सातारा परिसरात राहणारे ७४ वर्षांचे वृद्ध नागरिक दिलीपकुमार बिश्वनाथ घोष यांच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी नजर ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा "रिमोट ॲक्सेस" मिळवून बँक खाती आणि क्रेडिट कार्डवरून परस्पर मोठे आर्थिक व्यवहार केले.
१४ ऑक्टोबरला रात्री ८ ते ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला. घोष यांनी कोणताही ओटीपी सांगितला नाही किंवा कोणत्याही लिंकवर माहिती भरली नाही, तरीही त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ३० हजार ४६३ रुपये परस्पर वळते करण्यात आले. या प्रकरणाचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उभे राहत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.