पिंपरी-चिंचवडमध्ये १८ व्या मजल्यावरून आईची सहा वर्षांच्या मुलासह उडी, दोघांचा मृत्यू
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीत दुर्धर आजाराला कंटाळून महिलेने मुलासह उडी मारली. पोलिसांना चिट्ठी सापडली असून तपास सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसर शुक्रवारी सायंकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला. डांगे चौक येथील सिग्नेचर पार्क सोसायटीत एका महिलेने दुर्धर आजाराला कंटाळून आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत आई आणि तिचा मुलगा, दोघांचाही मृत्यू झाला.
शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एकता मनोज भांगड (वय ३३) आणि त्यांचा मुलगा माधव (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकता यांचे पती मनोज भांगड (वय ३५) येरवडा येथील एका आयटी कंपनीत नोकरी करतात. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे आहे. मनोज, त्यांची पत्नी एकता आणि मुलगा माधव हे तिघे डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमधील इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली दोन वर्षे राहत होते.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मनोज नेहमीप्रमाणे कामावर येरवड्याला गेले होते. त्यावेळी पत्नी एकता आणि मुलगा माधव हे दोघेही घरी होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये आवाज झाला, म्हणून रहिवाशांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. तेव्हा महिला आणि मुलगा खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. नागरिकांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा महिला आपल्या मुलासह लिफ्टने १८ व्या मजल्यावर गेल्याचे दिसले. तिथे त्यांनी चप्पल काढून ठेवल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोघे खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले असून पंचनामा आणि इतर तपासाची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मृत महिलेच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे.
पोलिसांना एक चिट्ठी सापडली आहे. त्यात दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तसेच मुलाला माझी खूप आठवण येईल, म्हणून मुलालाही सोबत नेते, असे त्यात नमूद आहे. या घटनेमुळे वाकड आणि डांगे चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.