पिंपरी-चिंचवडमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी मारून आई आणि सहा वर्षांच्या मुलाने जीव दिला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडली. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाने १८ व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात असलेल्या सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये ही घटना घडली. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव एकता मनोज भांगड असे आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सहा वर्षांच्या मुलानेही १८ व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. महिलेचे पती आयटी कंपनीत कामाला आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक पाहणीत दोघेही १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे समोर आले आहे. सध्या फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. या दोघांनी इमारतीवरून उडी मारून जीव दिल्याचे आढळून आले आहे. या घटनेबाबत पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी वाघाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गेल्या एका आठवड्यात जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत चिमूर तालुक्यातील गरडापार येथील ५५ वर्षांचे सदाशिव खडसंग यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे घडली. शेतात काम करत असताना ७० वर्षांचे शेतकरी पत्रुजी मेश्राम यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
तिसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात घडली. गायी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या ६० वर्षांच्या राजेश्वर सिडाम यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.