शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

सारसबागेसमोर उभ्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला, खुनाचा पोलिसांना संशय

सारसबागेसमोर उभ्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला, खुनाचा पोलिसांना संशय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

नेहरू स्टेडियमसमोर तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या अल्टो गाडीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले आणि कारमध्ये मृतदेह दिसला. खडक पोलीस तपास करत आहेत.

पुण्यातील गजबजलेल्या सारसबाग परिसरात नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अल्टो गाडीत हा मृतदेह आढळला असून, या व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून, आज गाडी उभ्या असलेल्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघड झाली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी बेवारस अवस्थेत उभी होती. बुधवारी या कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली आणि त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी लगेच खडक पोलीस स्टेशनला याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारचा दरवाजा उघडून पाहिल्यावर आतील सीटवर तरुणाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत दिसला. दोन दिवसांपासून बंद कारमध्ये पडून असल्याने मृतदेहाचा वास तीव्र झाला होता. बंद कारमध्ये ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ आहे. हा तरुण काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH12 SF 5471 या क्रमांकाच्या मारुती कारमध्ये हा मृतदेह मिळाला असून तो पुरुषाचा आहे. त्याचे वय साधारण २५ ते ३० वर्षे असावे आणि तो लोणी काळभोरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. सकाळी दादाची वाडी जैन मंदिरातील एका व्यक्तीने कंट्रोलला फोन करून गाडीतून वास येत असल्याचे कळवले. त्यानंतर पोलीस स्टाफ तिथे पोहोचला. प्राथमिक तपास झाल्यावर मृतदेह ससूनला नेऊन पुढील कारवाई केली जात आहे. मृतदेह एक-दोन दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. त्याचे भाऊ येऊन मृतदेह पाहतील आणि त्यांनी ओळख पटवल्यानंतरच नाव निश्चित करू, सध्या एवढीच प्राथमिक माहिती आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे आणि कसा झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ही कार त्या ठिकाणी नेमकी कोणी आणून उभी केली आणि या घटनेमागे घातपात आहे का, या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. त्यासाठी खडक पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ