शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

आंबळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; चालक पसार

आंबळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; चालक पसार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

कीर्तन ऐकून पायी घरी निघालेल्या चौघांना न्हावरे-शिरूर रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने मागून उडवले. दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, एक महिला गंभीर जखमी आहे.

शिरूर तालुक्यातील आंबळे येथे गुरुवारी (दि. २९) रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कीर्तन ऐकून पायी घरी निघालेल्या चौघांना न्हावरे-शिरूर रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. कीर्तन संपल्यानंतर केसरी हॉटेलसमोर हा अपघात घडला.

धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला थांबण्याऐवजी संबंधित वाहनचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचे वय १३ आणि ११ वर्षे होते. तिघेही आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी होते. ज्योती राजीव झेंडे (वय ४२) गंभीर जखमी झाल्या असून शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा. आंबळे) यांनी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावात दरवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहानिमित्त रोज रात्री महाप्रसाद आणि कीर्तन होते. गुरुवारी रात्री ज्योती झेंडे, त्यांच्या सासू कौशल्या झेंडे, त्यांचा मुलगा आणि शेजारी राहणारी, त्यांच्या चुलत जावेची मुलगी असे चौघे कीर्तन ऐकण्यासाठी गावात गेले होते. कीर्तन आणि महाप्रसाद आटोपल्यावर रात्री उशिरा चौघे रस्त्याच्या कडेने पायी घराकडे निघाले.

आंबळे गावाजवळ केसरी हॉटेलसमोर न्हावरेकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने या चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की चौघेही रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्योती आणि कौशल्या झेंडे यांना रुग्णवाहिकेतून शिरूर येथे नेण्यात आले.

कौशल्या झेंडे यांना शिरूर येथील श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आंबळे गावातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत वाहनचालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता तिथून पळ काढला होता. पळून गेलेले वाहन आणि त्याचा चालक शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील कारवाई करण्याच्या आणि अपघात करणारे वाहन व चालक यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार न्हावरे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके पुढील तपास करत आहेत.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ