आगीत उडी मारून रहिवाशांना जागं करणाऱ्या आर्या कांबळेचं मुख्यमंत्र्यांकडून पत्र पाठवून कौतुक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री सोसायटीच्या पार्किंगला लागलेल्या आगीत २० वर्षांच्या आर्या कांबळेनं ७० ते ८० रहिवाशांना सावध केलं. तिच्या धाडसाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून घेतली.
पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत धाडस दाखवणाऱ्या २० वर्षांच्या आर्या कांबळे हिची दखल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आर्याच्या धैर्याचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी तिला पत्र पाठवून अभिनंदन केलं आहे.
ही घटना मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली. एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग लागली आणि बघता बघता तिनं रौद्ररूप धारण केलं. सोसायटीतले ७० ते ८० रहिवासी त्या वेळी गाढ झोपेत होते. धूर आणि ज्वाळा आर्याच्या घराच्या दारापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे दार उघडता येत नव्हतं. आर्यानं आधी फायर ब्रिगेडला फोन केला.
परिस्थिती पाहून तिचे वडील घाबरले होते. मात्र आर्यानं या संकटाला धैर्यानं सामोरं जायचं ठरवलं. वडिलांचा विरोध असतानाही तिनं पहिल्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. या उडीत तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तरीही स्वतःच्या वेदनांकडे लक्ष न देता तिनं सोसायटीतल्या रहिवाशांना जागं केलं. सगळ्यांना घराबाहेर पडून टेरेसवर जायला सांगितलं आणि सगळे बाहेर पडले आहेत याची खात्रीही करून घेतली.
अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत पार्किंगमधली १७ दुचाकी आणि ४ चारचाकी अशी एकूण २१ वाहनं जळून खाक झाली होती. मात्र आर्याच्या धाडसामुळे एकाही जीवाला धोका झाला नाही. तिच्यामुळे ७० ते ८० जणांचा जीव वाचला, असं सांगितलं जात आहे.
आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे की संकटाच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणं हे धैर्य आणि प्रसंगावधानाचं जिवंत उदाहरण आहे. आर्याच्या शौर्यामुळे मोठी जीवितहानी टळली, असंही त्यांनी म्हटलं आहे. तिच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं.
पत्रात ते आर्याला उद्देशून म्हणतात, की ज्या धीरोदात्तपणे आणि प्रसंगावधान राखून तिनं अनेकांचे जीव वाचवले, त्या साहसाला तोड नाही. पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर पायाला दुखापत होऊनही इतरांना वाचवण्यासाठी तिनं केलेली धडपड हे मोठं साहसच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे.
महाराष्ट्राला शूर वीरांची आणि अनेक वीरांगनांची परंपरा लाभली आहे, याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. आधुनिक काळात आपत्कालीन परिस्थितीत धीरानं टाकलेलं पाऊल आणि संकटावर मात करण्यासाठी केलेली विचारपूर्वक कृती हीदेखील पराक्रमाहून कमी नाही, असं ते म्हणतात. मालमत्तेचं नुकसान भरून काढता येतं, पण जीव वाचवण्यासाठी कोणतीही पर्वा न करता तिनं घेतलेली झेप अतुलनीय आहे, असंही पत्रात आहे.
तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आर्याला सलाम करून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, या साहसातून तिनं राज्यातल्या युवा पिढीसमोर एक आदर्श घालून दिला आहे. तिचं साहस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कांबळे परिवारातील सर्व सदस्यांचं आणि आर्याच्या पुढील वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
चिंचवडमधल्या कुणाल मार्केट परिसरात ही आग लागली होती. आर्याच्या धाडसाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेनंही तिचा गौरव केला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.