रोहित पवार यांचा ज्ञानेश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, एसआयआरच्या निर्णयावरही सवाल
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्लाईड शो दाखवून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर प्रक्रियेवर आरोप केले, तसेच चौकशी आणि कारवाईची मागणी केली.
एमपीएससी विद्यार्थी आंदोलन आणि शेतकरी आंदोलनानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "SIR - निवडणूक आयोगाचे कारनामे" या स्लाईड शोच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक आरोप केले.
एसआयआरचा निर्णय नेमका कोणाचा, हा पवार यांचा मुख्य सवाल होता. माहिती अधिकारात याबद्दल विचारणा करण्यात आली होती. देशभर एवढी मोठी एसआयआर मोहीम राबवण्याचा निर्णय कोणी, कधी आणि कोणत्या अभ्यासाच्या आधारावर घेतला, असे त्यात विचारले होते. पवार यांच्या दाव्यानुसार निवडणूक आयोगाने उत्तर दिले की एसआयआर सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला नाही आणि त्याच्या मंजुरीचे कोणतेही रेकॉर्डही उपलब्ध नाही. कॅबिनेट सचिवांनीही सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सांगितल्याचे पवार म्हणाले. या उत्तरावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले.
स्लाईड शो दरम्यान पवार यांनी आकडेवारी मांडली. त्यानुसार देशात कायमचे स्थलांतरित झालेले 6.30 कोटी, तर राज्यात 76.76 लाख नागरिक आहेत. गैरहजर किंवा पत्ता नसलेले देशात 3.01 कोटी, तर राज्यात 75.41 लाख नागरिक आहेत. मयत नागरिक देशात 2.80 कोटी, तर राज्यात 34.82 लाख आहेत. दुबार मतदार देशात 1.02 कोटी, तर राज्यात 17.66 लाख आहेत.
मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया म्हणजे एसआयआर राबवताना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मनमानी पद्धतीने देशात 13 कोटी मतदारांना वगळण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला. या आरोपांमुळे आता खळबळ उडाली आहे.
काही उदाहरणेही त्यांनी दाखवली. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नितीश कुमार यांचा फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र त्यांनी दाखवले, पण त्यावर नाव मात्र अभिलाषा कुमारी असे आहे. अशी इतरही अनेक उदाहरणे देत त्यांनी एसआयआर प्रक्रियेवर, तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आणि कामकाजावर मोठा सवाल उपस्थित केला.
ज्ञानेश कुमार हे करप्ट व्यक्ती असून त्यांचा इतिहास भ्रष्टाचाराचा आहे, असा आरोप पवार यांनी केला. 2006 मध्ये ज्ञानेश कुमार केरळ कॅडरचे सनदी अधिकारी म्हणजे आयएएस होते आणि केरळ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव पदावर काम करत होते. त्या काळात ली बीन सीन या मलेशियन प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. त्याचा उल्लेख करत पवार यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप केले. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.