मुंबईत लोकलचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते ठाणे आणि कांजूरमार्ग ते भांडूप या दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बिघडल्याने सोमवारी सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सोमवारी मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे कोलमडली. सकाळी 10 वाजता मध्य रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बिघडली. एक बिघाड मुलुंड ते ठाणे या पट्ट्यात झाला, तर दुसरा कांजूरमार्ग ते भांडूप या पट्ट्यात झाला.
तांत्रिक बिघाड हे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नवीन नाहीत. त्यामुळे नेहमीसारखा किरकोळ बिघाड असेल, असेच त्यांना वाटले होते. पण साडेतीन तास उलटून गेल्यानंतरही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. सिग्नल यंत्रणेतील या बिघाडामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांची, तसेच जलद आणि धीम्या अशा दोन्ही मार्गांवरची वाहतूक बंद आहे.
सकाळी कार्यालयात जायला निघालेले कर्मचारी त्यामुळे ट्रेनमध्येच अडकून पडले आहेत. मुंबईत सध्या ऑक्टोबर हीटचा कडाका जाणवत आहे आणि अशा वेळी लोकल एकाच जागी थांबून राहिल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले. शेवटी काही प्रवाशांनी कंटाळून लोकलमधून उतरून रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत जाण्याचा पर्याय निवडला.
सकाळी 10 वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. साडेतीन तास झाले तरी रेल्वे प्रशासनाला सिग्नल यंत्रणेतील हा बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागू शकतात. त्यामुळे आज संध्याकाळी घरी परततानाही मुंबईकरांचे खूप हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प असल्याने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडीत भर पडण्याचीही शक्यता आहे.
कालच, म्हणजे रविवारी, मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक होता. तरीही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणा बिघडल्याने प्रवासी संतापले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इतक्या महत्त्वाच्या वाहतूक व्यवस्थेतील बिघाड दुरुस्त करायला यंत्रणांना चार तास उलटूनही यश मिळत नाही, यावरून रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे.
मध्य रेल्वे मार्गावर गाड्या उशिरा येणे आणि तांत्रिक बिघाड होणे हे प्रवाशांना नवीन नाही. पण सोमवारी या सगळ्याचा कळस गाठला गेला, अशी भावना प्रवाशांमध्ये आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.