मुंबईतील पाच स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; कोणाला मिळणार सवलत?
दिवाळी आणि छठपुजेच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील पाच प्रमुख स्थानकांवर पाच ते 15 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केली आहे.
देशभरात दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी दिसत आहे. दिवाळीबरोबरच उत्तर भारतातील मोठा सण असलेल्या छठपुजेसाठीही परप्रांतीय लोक आपापल्या गावी परतत आहेत.
दिवाळी आणि छठपुजेनिमित्त होणारी प्रवाशांची ही गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली आहे. सणाच्या काळात स्थानकांवर होणारी झुंबड कमी व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे स्टेशन आणि कल्याण स्टेशन या पाच स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद राहणार आहे. पाच नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटे मिळणार नाहीत, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या काळात फक्त अधिकृत रेल्वे तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणाने हा नियम कडक करण्यात आला असला, तरी काही गरजू प्रवाशांच्या मदतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना यातून सूट देण्यात येईल, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना सोडायला किंवा घ्यायला येणाऱ्या नातेवाईकांना ही सवलत मिळेल. आजारी प्रवाशांच्या मदतीला येणारे नातेवाईक, लहान मुलांसोबत प्रवास करणारे नातेवाईक आणि महिला प्रवाशांसोबत येणारे नातेवाईक यांनाही या नियमातून सूट देण्यात येणार आहे.
दिवाळी आणि छठपुजेसाठी मुंबईत राहणारे अनेक नागरिक गावाकडे जातात. त्यामुळे उत्तर भारत, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अशा वेळी प्लॅटफॉर्मवर फक्त प्रवास करणारे प्रवासीच उपस्थित राहावेत आणि चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही दुर्घटना टाळता यावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रवाशांनी आपापल्या ट्रेनच्या वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही रेल्वेने प्रवाशांना सांगितले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.