बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या, 10 राज्यांत पावसाची शक्यता; महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस कोरडे
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बंगालच्या उपसागरात गेल्या काही तासांपासून हालचाली सुरू आहेत. या हालचालींमुळे येत्या काही तासांत देशातील 10 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांचा त्यात समावेश आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते आणि आता ते आकार घेऊ लागले आहे. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळाला 'अर्णव' असे नाव देण्यात आले होते.
या सगळ्या वातावरणातील बदलांमुळे पुढच्या काही तासांत देशाच्या वेगवेगळ्या भागांत पाऊस पडू शकतो. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात मात्र वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किमीपर्यंत जाऊ शकतो. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने याबद्दल अंदाज सांगताना 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. मात्र हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस हवामान कोरडे राहू शकते.
27 ऑक्टोबरला गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता आहे.
28 ऑक्टोबरला राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, त्या दिवशी तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. कोल्हापूर घाट परिसर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातही पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
29 ऑक्टोबरला रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.