कर्जतमध्ये 100 एकरांवर अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी रिलायन्स फाउंडेशनची वसाहत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईजवळच्या कर्जतमध्ये रिलायन्स फाउंडेशन 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' ही निवासी टाऊनशीप उभारत आहे. रविवारी भूमिपूजन झाले.
रिलायन्स फाउंडेशन मुंबईजवळच्या कर्जतमध्ये 100 एकरांवर मोठी निवासी टाऊनशीप उभारत आहे. फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी याची घोषणा केली. 'अनंत आश्रय' असे या प्रकल्पाचे नाव आहे. येथे 5 हजारांहून अधिक गरजूंना आयुष्यभराचा निवारा मिळणार असून त्यांच्या रोजच्या देखभालीची व्यवस्थाही याच ठिकाणी केली जाणार आहे.
अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसह 5 हजारांहून अधिक जणांना हक्काचे घर देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. रविवारी नीता एम. अंबानी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ झाला. काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. रहिवाशांबरोबरच त्यांची काळजी घेणारे कर्मचारी, आरोग्यसेवा, डॉक्टर आणि इतर सहाय्यक कर्मचारीही येथे असतील. त्यामुळे सुमारे 15 हजार लोकांच्या समुदायाला या आश्रयात जागा मिळणार आहे. निवासी सुविधा, विशेष वैद्यकीय उपचार, पुनर्वसन, शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील.
दीर्घकाळ देखभालीची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवास, आरोग्यसेवा आणि प्रगतीच्या संधी देणे हा मुख्य हेतू असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' ही मनाच्या कोपऱ्यातील एक नवी सुरुवात आहे. दिव्यांग व्यक्ती, घराची गरज असलेली मुले आणि प्रेम, काळजी व आधाराच्या शोधात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रेमळ घर निर्माण करण्याच्या दिशेने पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. माणुसकी, काळजी आणि वैद्यकीय मदतीतून कौटुंबिक जिव्हाळा होईल असा जनसमूह येथे निर्माण करायचा आहे. त्यामुळे, निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करायला, शिकायला आणि आनंदाने सण-उत्सव साजरे करायला हक्काचं ठिकाण येथील प्रत्येकाला मिळेल."
नीता अंबानी पुढे म्हणाल्या, "आयुष्यभर आपल्या मुलांची काळजी घेतलेल्या आणि आपल्यानंतर आपल्या मुलांची काळजी करत जगणाऱ्या पालकांना येथे मनःशांती मिळावी, अशी एक आई म्हणून माझी तीव्र इच्छा आहे. माझे मूल आयुष्यभर सुरक्षित घरात आणि स्वतःच्या कुटुंबासारख्या प्रेमळ वातावरणात राहील, याची खात्री त्यांना वाटावी. 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय'मुळे प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची आणि प्रत्येक नव्या दिवसाकडे आशेने पाहण्याची संधी मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे."
टाऊनशीपमध्ये भारतीय नद्यांची नावे दिलेली आठ निवासी गावे असतील. प्रत्येक गावाची वेगळी रंगसंगती, वेगळी प्रतिके आणि संवेदनात्मक उद्याने असतील, म्हणजे रहिवाशांना आपला परिसर ओळखणे आणि सहज फिरणे जमेल. घरे कौटुंबिक वातावरणाची असतील. प्रत्येक घरासाठी वेगळा काळजीवाहक आणि पालकांच्या भूमिकेत काम करणारे कर्मचारी नेमले जातील. प्रत्येक रहिवाशासाठी स्वतंत्र देखभाल आराखडा तयार होईल. त्यात आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि वैयक्तिक कल्याण यांचा समावेश असेल, आणि त्याचा किमान दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाईल. परिसरात रुग्णालय, मंदिर, खेळाची मैदाने, उद्याने, शेती, कार्यशाळा आणि कॅफे अशा सुविधाही असतील.
रुग्णालयात विकासात्मक वैद्यकशास्त्र, अपस्मारावरील उपचार, विशेष गरजा असलेल्या रुग्णांसाठी दंतोपचार आणि वेदना कमी करणारे तसेच जीवनमान सुधारणारे उपचार मिळतील. पुनर्वसन सेवांमध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि हायड्रोथेरपी असेल. याशिवाय सर्वांना सामावून घेणाऱ्या क्रीडा आणि मनोरंजन सुविधा, विशेष शिक्षण सेवा, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नियमित शाळा आणि 'वंतारा' संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी सहवास केंद्र उभारले जाणार आहे.
बेकरी, कॅफे आणि हस्तकला केंद्रे सुरू करून रहिवाशांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी दिल्या जातील. कुटुंबीयांना काही काळ विश्रांती मिळावी म्हणून तात्पुरत्या निवासाची सोय, फिरते वैद्यकीय दवाखाने आणि पॅलिएटिव्ह केअर विभाग यांचीही योजना आहे. दिव्यांग व्यक्तींच्या देखभालीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणारी राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीही उभारायचे ठरले आहे.
शेजारची गावे आणि जिल्हे यांनाही काही निवडक सेवा दिल्या जाणार आहेत. परिसरातील सुमारे एक हजार लोकांना उपचार, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. जनजागृती कार्यक्रम, तात्पुरती देखभाल सेवा आणि सामुदायिक आरोग्यसेवा राबवण्याचेही नियोजन आहे. गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या असलेल्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल.
रिलायन्स फाउंडेशन ही रिलायन्स कंपनीची सामाजिक आणि परोपकारी काम करणारी संस्था आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण परिवर्तन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शहरी विकास तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांत तिचे काम चालते. देशातील 98 हजारांहून अधिक गावे आणि शहरी भागांत राबवलेल्या उपक्रमांचा लाभ आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.