मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करा, उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करा, उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

फटाक्यांच्या प्रदूषणाविरोधातला व्हिडिओ हटवल्यानंतर आणि दियाला हिंदूविरोधी ठरवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा हिने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी म्हणून एक व्हिडिओ बनवला होता. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, हा त्यामागचा हेतू होता. हा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आला. आता या सगळ्या प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करा, असे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

मुंबई महापालिका सेलिब्रिटींच्या मदतीने पर्यावरणपूरक दिवाळीसाठी मोहीम राबवत आहे. त्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी व्हिडिओ बनवले आणि त्यात दिया मिर्झाही होती. दिवाळीत फटाके फोडा, पण कमी फोडा, असे तिचे म्हणणे होते. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या न्यायालयाच्या निर्देशांबद्दल लोकांमध्ये जागरूकता व्हावी, म्हणून BMC च्या विनंतीवरूनच तिने हा व्हिडिओ केला होता.

भाजपच्या काही नेत्यांनी मात्र यावरून तिला हिंदूविरोधी ठरवले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, "दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा, संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत." मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी "दिया मिर्झा हिंदू विरोधी भूमिका घेते", असे म्हटले. त्यानंतर पालिकेने व्हिडिओ काढून टाकला.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले. काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आपण अस्वस्थ झालो आहोत, असे खंडपीठाने नोंदवले. राजकीय टीकेवर न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे," असे सांगून न्यायालयाने नेत्यांना सुनावले.

न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी विचारले की, न्यायालयाच्या आदेशानुसारच दियाने व्हिडिओ बनवला होता, मग तिच्या सहभागाला विरोध का? न्यायमूर्ती नीला गोखले म्हणाल्या, "हा पूर्णपणे पर्यावरणाचा विषय आहे, त्याला दुसरा कोणताही रंग देऊ नका. प्रत्येकजण एकच हवा श्वासातून घेत आहे." दुसऱ्या धर्मातील व्यक्ती आहे म्हणून तिला सण साजरा करण्यापासून किंवा जनजागृतीत सहभागी होण्यापासून कसे रोखू शकता, असा सवालही न्यायालयाने केला.

फटाक्यांवर निर्बंध म्हणजे सण साजरा करण्याचा अधिकार हिरावून घेणे नव्हे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सेलिब्रिटींनी निःस्वार्थपणे पुढाकार घेतला, पण त्याला विरोध होणे दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. मुंबईसारखे शहर एकोपा आणि परस्पर सामंजस्य यांच्या भावनेवर टिकून आहे, बेजबाबदार वक्तव्यांमुळे त्याला धक्का लागू नये, असे न्यायालयाचे मत आहे.

भारतात कोणत्याही व्यक्तीला कोणताही सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे खंडपीठाने बजावले. BMC ने सोशल मीडियावरून हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा आणि नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ