शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी, पीक पाहणी ऑनलाइन; महसूल विभागाचे दोन निर्णय

आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी, पीक पाहणी ऑनलाइन; महसूल विभागाचे दोन निर्णय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 राजकारण डेस्क

राज्यातील 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या निर्णयांचा लाभ होणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज दोन निर्णय घेतले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी द्यायचा आणि पीक पाहणी ऑनलाइन करायची, असे हे दोन निर्णय आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर याची घोषणा केली. या दोन निर्णयांमुळे राज्यातील 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि त्यात 1 लाख 60 हजार आदिवासी शेतकरी आहेत.

आदिवासी समाज जमिनी कसतो, पण पट्ट्यावर त्यांचे नाव नाही. इतर योजनांमध्येही त्यांचा समावेश नाही. राज्यात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना फॉर्मर आयडी मिळालेले नाहीत, तर एसओपी नसल्याचाही अडसर आहे. अशा आदिवासींना फॉर्मर आयडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याला क्रांतिकारी निर्णय असे म्हटले गेले आहे.

बावनकुळे यांनी सांगितले की, आदिवासींनी 1 जानेवारी 2015 पूर्वीचा एकही पुरावा दिला, तरी त्यांना फॉर्मर आयडी दिले जाणार आहेत. 1 जानेवारी 2015 पूर्वी आदिवासी शेतकरी कोणत्याही प्रकारची जमीन कसत असेल, तर त्याला हस्तलिखित रेकॉर्ड दिले जाईल. ती सरकारची जमीन असली, तरी ज्यांचा त्यावर अधिकार आहे, त्या सर्वांना फॉर्मर आयडी मिळणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने महसूल विभागाने 1 लाख 60 हजार आदिवासी शेतकऱ्यांना हा दिलासा दिला आहे.

दुसरा निर्णय पीक पाहणीचा आहे. आता पीक पाहणी ऑनलाइन केली जाणार आहे. त्यामुळे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची रखडलेली पीक पाहणी सोपी होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

कर्जतमध्ये झाडे तोडली जात असल्याने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याबद्दलही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात हायड्रो प्रकल्प वरदान असतो, त्यामुळे आज स्वस्त वीज मिळते आणि हायड्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाचा कधीच ऱ्हास होत नाही, असे ते म्हणाले. सयाजी शिंदे यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेऊ, असे सांगून त्यांनी म्हटले की, एकूण किती झाडे लावायची, त्यासाठी आम्ही जमीन देऊ. झाडे तोडणे योग्य नाही, पण हायड्रो प्रकल्प परत जाणेही योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि दिलासा मिळेल, असा दावा बावनकुळे यांनी केला.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची एका वर्तमानपत्रात मुलाखत छापून आली आहे. त्यावरही बावनकुळे यांनी टीका केली. सोनिया गांधी काय बोलल्या ते माहीत नाही, पण ज्या काँग्रेस पक्षाने देशावर आणीबाणी लादली, त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुलभूत अधिकार यावर बोलू नये, असे ते म्हणाले. सोनिया गांधी यांनी आधी आपल्या पक्षाचा इतिहास तपासावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ