YouTube आणणार कस्टम फीड्स आणि कमेंटमध्ये जिआयएफचा पर्याय
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्युबने मेड ऑन युट्युब या इव्हेंटमध्ये नवी फीचर्स जाहीर केली, ज्यात एआयच्या मदतीने तयार होणारी कस्टम फीड सर्वात लक्षवेधी आहे.
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्युबने आपल्या यूजर्सचा अनुभव आणखी बदलण्यासाठी नवी तयारी सुरू केली आहे. कंपनीने मेड ऑन युट्युब या इव्हेंटमध्ये अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली, ज्यात सर्वात लक्षवेधी फीचर आहे कस्टम फीड्स. या फीचरमुळे यूजर्सना एआयची मदत घेऊन स्वतःच्या आवडीनुसार वेगळी व्हिडीओ फीड तयार करता येणार आहे. यासोबतच कमेंट सेक्शनमध्ये लवकरच जिआयएफ पोस्ट करण्याचा पर्यायही मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम फीड्स फीचरमुळे यूजर्सना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे वेगवेगळ्या व्हिडीओ फीड तयार करता येणार आहेत. यासाठी यूजर्सना फार क्लिष्ट काही करावं लागणार नाही, सोप्या भाषेत त्यांना कोणत्या प्रकारचे व्हिडीओ पाहायचे आहेत हे सांगता येईल. उदाहरणार्थ, एखाद्याला वर्कआउटचे व्हिडीओ हवे असतील, तर तो त्यासाठी वेगळी फीड बनवू शकतो. कोणाला मोठे डॉक्युमेंटरी व्हिडीओ आवडत असतील किंवा एखाद्या खास कॅटेगरीतील नव्या क्रिएटर्सचे व्हिडीओ पाहायचे असतील, तर त्यासाठीही वेगळी फीड तयार करता येईल. म्हणजेच प्रत्येक यूजरला त्याच्या स्वतःच्या आवडीनुसार वेगवेगळी फीड ठेवण्याची मुभा मिळणार आहे.
या फीचरमध्ये एआय यूजरने सांगितलेल्या आवडीनुसार व्हिडीओ मॅनेज करणार आहे. यासाठी गूगलचे जेमिनी एआय मॉडेल वापरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तयार झालेली ही फीड युट्युबच्या होमपेजवर एका वेगळ्या टॅबमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे यूजर्सना गरजेनुसार एकापेक्षा जास्त कस्टम फीडदेखील तयार करता येणार आहेत, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळ्या फीड ठेवता येतील.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे कस्टम फीड फीचर आधी अमेरिकेतील यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वेब, मोबाईल आणि टीव्हीवर हे फीचर लवकरच सुरू होऊ शकते. यामुळे यूजर्सना त्यांच्या वेगवेगळ्या मूडनुसार, आवडीनुसार आणि रोजच्या रुटिननुसार युट्युबवरचा कंटेंट निवडता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, कस्टम फीडमुळे युट्युबची आधीपासून असलेली मुख्य फीड बंद होणार नाही. उलट यूजर्सना गरजेनुसार वेगवेगळ्या फीडमध्ये स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे, म्हणजे जुनी फीड आणि नवी कस्टम फीड दोन्ही एकत्रच वापरता येतील.
युट्युबच्या कमेंट सेक्शनमध्येही मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत यूजर्स कमेंटमध्ये फक्त टेक्स्ट लिहू शकत होते, पण आता जिआयएफचाही वापर करता येणार आहे. यासाठी प्लॅटफॉर्मवर जिआयएफची एक लायब्ररी उपलब्ध असेल, तिथून यूजर्सना आवडीचा जिआयएफ निवडून तो कमेंटमध्ये पेस्ट करता येईल. हे फीचर जगभरातील युट्युबच्या मोबाईल ॲपवर याच वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सना त्यांच्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येणार आहेत, आणि नुसत्या शब्दांऐवजी जिआयएफच्या माध्यमातूनही प्रतिक्रिया देता येईल.