विसापूर क्रीडा संकुलात अग्निवीर भरती सुरू, 8017 उमेदवार चाचणीसाठी हजर
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 2 ऑक्टोबरपासून सुरू असलेली अग्निवीर सैन्य भरती 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदांच्या भरतीसाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील क्रीडा संकुलात 2 ऑक्टोबरपासून सैन्य भरती प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. ही प्रक्रिया 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात राज्यातील मिळून एकूण 8017 उमेदवार यात सहभागी होत आहेत.
उमेदवारांच्या संख्येचा तपशील असा : विदर्भातील 6556, महाराष्ट्रातील इतर भागांतील 930 आणि गुजरात राज्यातील 531 उमेदवार भरतीला आले आहेत. भारतीय सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर यांच्या वतीने यापूर्वी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आता पुढच्या टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणी घेतली जात आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (दहावी उत्तीर्ण) आणि अग्निवीर ट्रेड्समन (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी ही भरती आहे.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय सैन्याच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि निकषांनुसार प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीतपणे राबवली जात आहे.
सैन्य भरती सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावी, म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित विभागांची आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या. क्रीडा संकुलाची डागडुजी आणि स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अखंडित वीजपुरवठा, कायदा व सुव्यवस्था, वैद्यकीय सेवा, अग्निसुरक्षा, वाहतूक व्यवस्था, भोजन सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
या कामासाठी पोलीस विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, बल्लारपूर नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वीज वितरण विभाग, परिवहन विभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. भरतीसाठी आलेल्या सैन्य पथकाच्या निवासाची व्यवस्थाही विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून जेवणाची व्यवस्था सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत औद्योगिक कंपन्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, जीएमआर एनर्जी लिमिटेड, ओमेंट बेस्ट लिमिटेड, अरविंदो रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., केपीसीएल, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट या 12 कंपन्यांचा सहभाग आहे. भोजन व्यवस्थेचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांच्या समन्वयाने केले जात आहे.
महिला बचत गटांनाही यातून रोजगाराची संधी मिळाली आहे. उमेदवारांना खाद्यपदार्थ आणि रोजच्या गरजेच्या वस्तू सहज मिळाव्यात, म्हणून माविम आणि उमेद यांच्या माध्यमातून क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर महिला बचत गटांचे सशुल्क स्टॉल लावून देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांची सोय झाली आहे आणि बचत गटांना व्यवसायाची संधीही मिळाली आहे.
ही अग्निवीर भरती आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर येथील भरती अधिकारी कर्नल अंशुल श्रीवास्तव यांच्या अधिपत्याखाली, भारतीय सैन्याच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि निकषांनुसार राबवली जात आहे. उमेदवारांची निवड पूर्णपणे सैन्याच्या नियमानुसार होत असून, जिल्हा प्रशासन सैन्य भरती पथकाला लागणाऱ्या प्रशासकीय आणि पायाभूत सुविधा पुरवत आहे.
भरतीदरम्यान उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर यांनी दिली.