चंद्रपूरमध्ये युवासेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल, अवैध रेतीचा हायवा पकडला
राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त झाला असून, चालक आणि मालक शैलेश केळझरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणारा एक हायवा पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणात शिवसेना (शिंदे) युवासेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांचे नाव पुढे आले आहे. पोलिसांनी हायवाचा चालक आणि वाहनमालक अशा दोघांवर गुन्हा दाखल केला असून, या धडक कारवाईत तीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धानोरा आर्वी टी पॉईंट परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली होती.
त्या वेळी आर्वीकडून विरूरच्या दिशेने येणारा एक संशयास्पद हायवा (क्रमांक MH34BZ9950) पोलिसांनी थांबवला आणि चालकाकडे विचारपूस केली. चालकाने आपले नाव दत्ता दशरथ मेश्राम (वय २६, रा. बाबुपेट, चंद्रपूर) असे सांगितले. पंचांसमोर गाडीची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात रेती भरलेली आढळली.
पोलिसांनी रेती वाहतुकीचा परवाना आणि इतर कागदपत्रे मागितली, तेव्हा चालकाकडे कोणताही परवाना किंवा अधिकृत कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. गाडीत सुमारे २७ हजार रुपये किमतीची ९ ब्रास रेती होती, तर हायवाची किंमत ३० लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ३० लाख २७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
चौकशीत चालक दत्ता मेश्राम याने कबूल केले की, ही रेती तो हायवाचे मालक शैलेश अशोक केळझरकर (वय ३९) यांच्या सांगण्यावरून भरून नेत होता. केळझरकर हे राजुरा तालुक्यातील तीर्थरूप नगर, तुकूम, चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
अवैध मार्गाने रेती वाहतूक करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी विरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून चालक दत्ता दशरथ मेश्राम आणि वाहनमालक शैलेश अशोक केळझरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३०३(२) आणि ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मंगला पांढुरंग मेश्राम करत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती चोरांचे धाबे दणाणले आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.