विद्युत जामवालने १५ मिनिटं श्वास रोखला, मुंबईतील कार्यक्रमातील योगप्रात्यक्षिकाचा व्हिडीओ चर्चेत
मुंबईत 'स्ट्रीट फायटर'च्या एका विशेष कार्यक्रमात अभिनेता विद्युत जामवालने सुमारे १५ मिनिटं श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. जबरदस्त फिटनेस, मार्शल आर्ट्सचं कौशल्य आणि वेगळ्या योगाभ्यासासाठी तो ओळखला जातो. सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असतो. आपल्या कठीण व्यायामाचे तसेच योगासनांचे व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या त्याचाच असा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
मुंबईत 'स्ट्रीट फायटर'च्या एका विशेष कार्यक्रमाला विद्युत जामवालने हजेरी लावली होती. तिथे त्याने असं काही करून दाखवलं की उपस्थित लोकांनाही काही क्षण आश्चर्याचा धक्का बसला. त्याने या कार्यक्रमात सुमारे १५ मिनिटं श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमादरम्यान विद्युत पूर्णपणे स्थिर बसला होता आणि त्याने आपल्या योगसाधनेचं प्रात्यक्षिक सादर केलं. पण जसजसा वेळ पुढे गेला, तसतसं त्याचं शरीर थरथरू लागलं आणि डोळ्यांत पाणी आलं. त्याला अशा अवस्थेत पाहून समोर बसलेले प्रेक्षकही चिंतेत पडले. तरीही त्याने आपली साधना पूर्ण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी विद्युतच्या या कौशल्याचं कौतुक करत आहेत.
'स्ट्रीट फायटर'मध्ये विद्युत जामवालने धल्सिम या गेमिंग पात्राची भूमिका केली आहे. हे पात्र योग आणि आध्यात्मिक साधनेशी जोडलेलं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटातील पात्राचे गुण आणि स्वतःची योगसाधना यांच्यातला संबंध दाखवण्यासाठी विद्युतने हे खास प्रात्यक्षिक सादर केल्याचं सांगितलं जात आहे.
मेडिटेशन पूर्ण केल्यानंतर विद्युतने आपल्या या साधनेबद्दल माहिती दिली. पतंजलीच्या योगसूत्रांमधील एका विशेष तंत्राचा वापर केल्याचं त्याने सांगितलं. या सरावामुळे आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्यास मदत झाल्याचंही तो म्हणाला.
विद्युतच्या मते, योग हा फक्त शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग नाही. तो माणसाला मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आत्मनियंत्रण आणि शांत राहण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे, असं त्याने सांगितलं.
या वेळी विद्युतने तरुणांसाठीही खास संदेश दिला. आजच्या काळात प्रत्येकजण काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत धावत आहे आणि प्रत्येकाचं लक्ष सतत निकालांकडे असतं. पण या धावपळीत काही क्षण थांबून शांत राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं विद्युतने सांगितलं. तरुणांनी काही वेळ स्वतःला थांबवून स्थिर राहण्याचा सराव करावा, असा सल्लाही त्याने दिला. त्याच्या या वेगळ्या योगप्रात्यक्षिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.